नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
लोकसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये बुधवारी (दि.31) आरोप-प्रत्यारोपांची लढाई खूप वेळ सुरु होती. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जातीबाबत केलेल्या टिप्पणीच्या मुद्द्याने आता जोर पकडला आहे. काँग्रेसने यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. अनुराग ठाकूर यांची टिप्पणी पंतप्रधानांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून पोस्ट करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसने पंतप्रधानांवर विशेषाधिकार भंगाचा आरोप केला आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजित सिंग चन्नी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. चन्नी म्हणाले की, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात बरेच आक्षेपार्ह शब्द बोलले. त्यांच्या भाषणातील आक्षेपार्ह भाग लोकसभेच्या अध्यक्षांनी रेकॉर्डमधून काढून टाकले आहेत. अध्यक्षांनी काढलेले भाषण प्रसारित करणे हा सभागृहाचा अवमान आहे. हे विशेषाधिकार भंगाचे प्रकरण आहे. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देशाच्या पंतप्रधानांनी भाषणाचा तोच भाग सोशल मीडिया पोस्ट करून अनुराग ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे. या कारणास्तव पंतप्रधानांविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव ठेवल्याचे चन्नी यांनी सांगितले.
भाजप खासदाराचे भाषण त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर पोस्ट करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, तरुण आणि उत्साही सहकारी अनुराग ठाकूर यांचे हे भाषण ऐकले पाहिजे. तथ्ये आणि विनोद यांचे उत्तम मिश्रण, ते इंडी आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड करते. विशेष म्हणजे लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, संसदेत कोणाची जात विचारली जात नाही. अपमान करण्यासाठी हे हेतूनुसार करण्यात आले आहे. पंतप्रधानांनीही अशा अशोभनीय गोष्टींचे समर्थन करू नये. कधी आणि कशाचा बचाव करायचा हे पंतप्रधानांना कळायला हवे. अशा असभ्य गोष्टींचा आणि त्यांच्या समर्थनार्थ नरेंद्र मोदींनी केलेल्या पोस्टचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले.