Shiv Sena UBT crisis file photo
राष्ट्रीय

Shiv Sena UBT crisis: “हे तर ‘ऑपरेशन चिखल’! या राजकीय दरोड्यामागचा हेतू काय?” शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर काँग्रेसची टीका

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'ऑपरेशन टायगर'वरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मोहन कारंडे

Shiv Sena UBT crisis:

नवी दिल्ली: मागील आठवडाभर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चा सुरू आहेत. हे ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेंनी यशस्वीरीत्या पूर्ण केले असून त्याची औपचारिक घोषणा आज होणार आहे. राज्यातील या घडामोडीनंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'ऑपरेशन टायगर'वरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली. शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला काँग्रेसने ‘ऑपरेशन चिखल'’ अशी उपमा दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भाजपचे 'ऑपरेशन लोटस' आणि 'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या मोहिमेचा संदर्भ देत भाजपवर ताशेरे ओढले आणि या "दरोड्यामागील हेतू" काय, असा सवाल केला. खेरा म्हणाले की, “ज्या मतदारसंघांमध्ये कमळ फुलू शकले नाही, तिथे हे ‘ऑपरेशन चिखल’ सुरू करण्यात आले आहे. भाजपला ४०० जागांचे लक्ष्य गाठता आले नाही आणि ते २४० जागांवर थांबले, याची इतकी खंत का आहे? आता इतर पक्षांतील खासदारांना फोडण्याचे काम का सुरू आहे? यामागचा नेमका हेतू काय? संविधान बदलण्याचा प्रयत्न आहे का? हा राजकीय दरोडा कशासाठी?” असे सवाल खेरा यांनी उपस्थित केले.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या चार वर्षांत बसलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. एकेकाळी ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असलेले एकनाथ शिंदे यांनी आधी पक्षात मोठी फूट पाडली होती. आता लोकसभेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

विकले गेलेले खासदार मुंबईत... : संजय राऊत

दरम्यान, आज दुपारी चार बंडखोर खासदारांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी 'एक्स' वर पोस्ट केली आहे. "५०-५० कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलीस गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे. त्यांची पुढील पिढी सांगेल मेरा बाप गद्दार था, मेरा पती गद्दार था, मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT