Cough syrup
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कफ सिरपमुळे १४ हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याने देश हादरला आहे. हे औषध बनवणाऱ्या कंचापुरम येथील श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीबाबत तामिळनाडू सरकारच्या २६ पानांच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीने कफ सिरपच्या उत्पादनात ३५० नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात म्हटले आहे.
अहवालात कंपनीतील धक्कादायक वास्तव
तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटने केलेल्या तपासणीचा एक विशेष अहवाल समोर आला आहे. तपासणीत कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत ३५० हून अधिक त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीमध्ये 'कोल्ड्रिफ' कफ सिरपचे उत्पादन अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत केले जात होते. कंपनीकडे मूलभूत सुविधा, पात्र कर्मचारी आणि योग्य कार्यपद्धतीचा अभाव होता. हवा शुद्धीकरण यंत्रणा नव्हती, वातानुकूलन व्यवस्था खराब होती. उपकरणे खराब आणि गंजलेली होती. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या अहवालाच्या वृत्तानुसार उत्पादन केंद्राची रचना आणि वातावरणच दूषित औषधाला कारणीभूत ठरत होतं. शिवाय क्वालिटी अशुरन्स विभाग अस्तित्वात नव्हता आणि कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडे बॅच रिलीजची जबाबदारी नव्हती.
कंपनीने शुद्ध पाण्याची व्यवस्था, कीटक नियंत्रण किंवा स्वच्छता प्रणाली यापैकी काहीही पुरवले नव्हते. औषधे अयोग्य ठिकाणी ठेवली जात होती, ज्यामुळे त्यांना धूळ आणि क्रॉस-कन्टॅमिनेशनचा धोका वाढला होता, असेही अहवालात नमूद आहे.
घातक केमिकल्सचा वापर
सर्वात धक्कादायक म्हणजे, कंपनीने ५० किलो प्रोपीलीन ग्लायकोल अवैधरित्या खरेदी केले होते. तसेच, सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) चे अंश आढळले. डायथिलीन ग्लायकोल हे अत्यंत विषारी सॉल्व्हेंट ब्रेक ऑईल, रंग आणि प्लास्टिकमध्ये वापरले जाते. प्रोपीलीन ग्लायकोल हे अन्न, औषधनिर्माण आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे कमी विषारी औद्योगिक सॉल्व्हेंट आहे, परंतु डायथिलीन ग्लायकोल कमी प्रमाणात देखील मानवांसाठी घातक ठरत.
फॉर्म्युलेशन ट्रान्सफरसाठी प्लास्टिक पाईप्सचा वापर
अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे की, कंपनीने द्रव फॉर्म्युलेशन ट्रान्सफरसाठी प्लास्टिक पाईप्सचा वापर केला होता. रासायनिक सांडपाणी थेट सार्वजनिक नाल्यांमध्ये सोडले जात होते. महत्वाच्या उत्पादन कार्यात वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या अस्वच्छ स्थितीत आढळल्या.
उत्पादनाच्या सर्व टप्प्यांवर त्रुटी
तपासणी पथकाला असे आढळले की, कच्चा माल कोणतीही तपासणी किंवा विक्रेता मंजुरीशिवाय वापरला जात होता. तसेच, प्रतिकूल प्रतिक्रियांचे निरीक्षण करण्यासाठी कोणतीही 'फार्मकोव्हिजिलन्स सिस्टीम' नव्हती. नमुने खुल्या वातावरणात घेतले जात होते, ज्यामुळे दूषित होणे अपरिहार्य होते. कंपनीकडे कुशल मनुष्यबळाचाही अभाव होता. analytical test methods आणि साफसफाईच्या कार्यपद्धतींसह प्रमुख गुणवत्ता तपासणी कधीही केली गेली नव्हती.
तमिळनाडू सरकारने मागितले स्पष्टीकरण
या तपासणीनंतर, तमिळनाडू सरकारने १ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात 'कोल्ड्रिफ' कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आणि बाजारातील सर्व साठा काढून टाकण्याचे आदेश दिले. फॅक्टरीतून गोळा केलेले नमुने भेसळयुक्त असल्याचे नंतर निश्चित झाले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सरकारने कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.