Coffee  File Photo
राष्ट्रीय

Coffee Benefits for Brain Health: दररोज २ ते ३ कप कॉफी पिणाऱ्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका कमी? अभ्यासात काय आढळले?

दररोज दोन ते तीन कप कॅफिनयुक्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे एका दीर्घकालीन संशोधनातून समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Coffee Benefits for Brain Health

नवी दिल्ली: सकाळची सुरुवात अनेकांसाठी कॉफीच्या एका कपाशिवाय पूर्ण होत नाही. झोप घालवण्यापासून ते दिवसभर उत्साही राहण्यापर्यंत कॉफीची मदत होते. मात्र, कॉफी पिण्याचा आणखी एक फायदा समोर आला आहे. दररोज दोन ते तीन कप कॅफिनयुक्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे एका दीर्घकालीन संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, कॅफिन नसलेल्या कॉफीच्या बाबतीत असा कोणताही परिणाम दिसून आला नाही.

अमेरिकेतील प्रौढांवर ४३ वर्षांपर्यंत केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक दररोज २ ते ३ कप कॅफिनयुक्त कॉफी पितात, त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण खूप कमी असते येथे दरवर्षी प्रति १ लाख व्यक्तींमागे १४१ रुग्ण आढळले, तर कॉफी न पिणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ३३० रुग्ण इतके होते.

अमेरिकेतील प्रौढांवर केलेल्या एका दीर्घकालीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक नियमितपणे कॅफिनयुक्त कॉफी पितात, त्यांच्यामध्ये कॉफी न पिणाऱ्या किंवा खूप कमी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत स्मृतिभ्रंशाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते. विशेष म्हणजे, जे लोक कॅफिन नसलेली कॉफी घेतात, त्यांच्यामध्ये असा कोणताही संबंध दिसून आला नाही. ज्यांनी दररोज सुमारे दोन ते तीन कप कॅफिनयुक्त कॉफी घेतली, त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका सर्वात कमी असल्याचे आढळले. यामुळे मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यामध्ये कॅफिन आणि कॉफीमधील इतर घटकांची काय भूमिका असू शकते, यावर नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.

'कॉफी अँड टी इनटेक, डिमेंशिया रिस्क, अँड कॉग्निटिव्ह फंक्शन' नावाचे हे संशोधन 'जामा' या जर्नलमधून प्रकाशित झाले आहे. यात अमेरिकेतील दोन दीर्घकालीन आरोग्य अभ्यासांमधील 'नर्सेस हेल्थ स्टडी' आणि 'हेल्थ प्रोफेशनल्स फॉलो-अप स्टडी' माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

या संशोधनात एकूण १,३१,८२१ जणांचा समावेश होता. त्यामध्ये ८६,६०६ महिला आणि ४५,२१५ पुरुष होते. संशोधकांनी अनेक दशकांपर्यंत या सहभागींच्या आहाराच्या सवयी आणि आरोग्यविषयक स्थितीचा मागोवा घेतला. दर दोन ते चार वर्षांनी प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांच्याकडून कॅफिनयुक्त कॉफी, कॅफिनविरहित कॉफी आणि चहाच्या सेवनाची माहिती गोळा करण्यात आली.

४३ वर्षांच्या संशोधनातून काय समोर आले?

संशोधनादरम्यान १,३१,८२१ सहभागींपैकी ११,०३३ जणांना स्मृतिभ्रंशाचे निदान झाले. त्यानंतर संशोधकांनी सर्वाधिक आणि सर्वात कमी कॅफिनयुक्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींच्या आकडेवारीची तुलना केली. त्यातून दोन्ही गटांमध्ये मोठी तफावत दिसून आली. सर्वाधिक कॅफिनयुक्त कॉफी पिणाऱ्या गटात दर एक लाख व्यक्ती-वर्षांमागे स्मृतिभ्रंशाची १४१ प्रकरणे आढळली. तर कॉफीचे अत्यल्प सेवन करणाऱ्या किंवा अजिबात कॉफी न पिणाऱ्या गटात हे प्रमाण ३३० होते. म्हणजेच, नियमित कॅफिनयुक्त कॉफी पिणाऱ्या गटात स्मृतिभ्रंशाचे प्रमाण तुलनेने कमी होते.

स्मृतिभ्रंश म्हणजे नेमके काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. अल्झायमर असोसिएशनच्या माहितीनुसार, स्मृतिभ्रंश ही मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या विविध आजारांसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, भाषा, मनःस्थिती आणि वर्तन यांमध्ये हळूहळू बदल होऊ शकतात.

दिवसातून किती कप कॉफी पिणे फायदेशीर?

संशोधनानुसार, दररोज दोन ते तीन कप कॅफिनयुक्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका सर्वात कमी असल्याचे दिसून आले. मात्र, याचा अर्थ अधिक कॉफी प्यायल्यास अधिक फायदा होतो, असा नाही. दिवसातून तीन कपांपेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने अतिरिक्त फायदा मिळत असल्याचे संशोधनात आढळले नाही. कॉफीप्रमाणेच चहाच्या सेवनाबाबतही संशोधकांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. दररोज एक ते दोन कप चहा पिणाऱ्या व्यक्तींमध्येही स्मृतिभ्रंशाचे प्रमाण कमी असण्याचा संबंध आढळला. दररोज सुमारे ३०० मिलिग्रॅम कॅफिनचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा संबंध सर्वाधिक ठळक होता. या संशोधनातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कॅफिनयुक्त आणि कॅफिनविरहित कॉफीच्या परिणामांमधील फरक. कॅफिनयुक्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण कमी असल्याचा संबंध आढळला. मात्र, कॅफिन नसलेली कॉफी पिणाऱ्यांमध्ये असा कोणताही महत्त्वपूर्ण संबंध दिसून आला नाही.

कॅफिन हे कॉफी, चहा आणि काही वनस्पतींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे उत्तेजक द्रव्य आहे. याच्या सेवनामुळे शरीरातील थकवा कमी होण्यास आणि सतर्कता वाढण्यास मदत होते. कॅफिनयुक्त आणि कॅफिनविरहित कॉफीच्या निष्कर्षांमधील फरकामुळे कॅफिन किंवा कॉफीतील इतर घटक मेंदूच्या आरोग्याशी संबंधित असू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, या संशोधनातून कॅफिनमुळेच स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो, हे सिद्ध झालेले नाही. कारण हे निरीक्षणावर आधारित संशोधन आहे. त्यामुळे कॉफी पिणे आणि स्मृतिभ्रंशाचे कमी प्रमाण यांच्यात संबंध दिसला असला, तरी कॉफीमुळेच हा धोका कमी झाला, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. तसेच, या संशोधनातील सहभागींपैकी बहुतांश जण आरोग्य क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक होते. त्यामुळे इतर सामाजिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्येही असेच निष्कर्ष दिसतात का, हे तपासण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT