Cockroach Janata Party: देशातील तरुणांमध्ये आणि सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक नाव प्रचंड चर्चेत आहे ते म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP). काही दिवसांतच सोशल मीडियावर मोठ्या आणि जुन्या राजकीय पक्षांनाही मागे टाकणाऱ्या या डिजिटल आंदोलनाभोवती आता वादाचं सावट निर्माण झालं आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दावा केला आहे की, त्यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले असून, आता त्यांचं त्यावर कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही.
या दाव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कारण, लाखो युवकांसाठी सरकारविरोधी व्यंगात्मक आवाज म्हणून समोर आलेल्या या डिजिटल चळवळीला आता लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मध्यरात्री बसला मोठा धक्का?
अभिजीत दिपके यांनी काही स्क्रीनशॉट्स शेअर करत सांगितले की, त्यांनी अकाउंट परत मिळवण्यासाठी मेटाच्या अधिकृत रिकव्हरी प्रक्रियेचा अनेकदा वापर केला. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले. दिपके यांच्या मते, “Recover It Now” पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यांना सतत एकाच प्रकारचा मेसेज दिसत होता. “तुमच्या सुरक्षेसाठी तुमचे Instagram अकाउंट लॉक करण्यात आले आहे. अकाउंट परत मिळवण्यासाठी तुमची ओळख तपासा आणि नवीन पासवर्ड तयार करा.”
सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने करूनही अकाउंट रिकव्हर होत नसल्याने आता प्रश्न उपस्थित होत आहेत. हे केवळ हॅकिंग आहे की चळवळीला रोखण्याचा प्रयत्न, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
X अकाउंट ब्लॉक, बॅकअप अकाउंटही बंद
यापूर्वी पक्षाचे मुख्य X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर “Cockroach Is Back” नावाने नवीन अकाउंट सुरू करून त्यांनी सोशल मीडियावर पुनरागमन केले.
अभिजीत दिपके यांनी असेही म्हटले की, पक्षाचे बॅकअप इंस्टाग्राम अकाउंट काही काळासाठी अचानक सस्पेंड करण्यात आले होते. मात्र, काही तासांनंतर ते पुन्हा सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इतकी लोकप्रियता नेमकी कशी मिळाली?
काही दिवसांपूर्वी इंटरनेटवरील व्यंगात्मक मोहिम म्हणून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी आता सोशल मीडियावर वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आंदोलनांपैकी एक बनली आहे. बेरोजगारी, NEET परीक्षा वाद, पेपर लीक, राजकीय उत्तरदायित्वाचा अभाव आणि तरुणांमधील नाराजी या मुद्द्यांमुळे Gen Z वर्ग या चळवळीकडे आकर्षित झाल्याचे बोलले जात आहे.
काही समर्थकांच्या मते, या पक्षाने इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत मोठ्या राजकीय पक्षांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे या डिजिटल आंदोलनाकडे गंभीरपणे पाहिले जाऊ लागले आहे.
‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ की ‘तरुणांचा आवाज’?
या वाढत्या लोकप्रियतेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. काही सत्ताधारी समर्थकांनी या चळवळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका म्हटले आहे. तर सोशल मीडियावर काही यूजर्सनी या आंदोलनाचा संबंध परदेशी लोक किंवा विरोधी पक्षांशी असल्याचे दावे केले आहेत.
दुसरीकडे, अनेक सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे नेते आणि काही सेलिब्रिटींनी या आंदोलनाला तरुणांच्या नाराजीचा डिजिटल आवाज असे म्हणत समर्थन दर्शवले आहे.
CJP चा अजेंडा काय?
अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या या डिजिटल चळवळीचा भर निवडणूक सुधारणा, संस्थात्मक जबाबदारी, महिलांसाठी आरक्षण आणि NEET सारख्या परीक्षा घोटाळ्यांवर कठोर कारवाई यावर असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, अकाउंट्सवर निर्बंध आणि वाद वाढत असतानाही कॉकरोच जनता पार्टीची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. उलट प्रत्येक दिवसागणिक या चळवळीभोवतीची उत्सुकता आणि वाद वाढत आहेत. आता हा इंटरनेटवरील विरोध भविष्यात प्रत्यक्ष राजकीय पक्षात रूपांतरित होणार की डिजिटल पुरताच मर्यादित राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.