CNG Price Hike Pudhari
राष्ट्रीय

CNG price hike: पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; ११ दिवसांत चौथ्यांदा दरात वाढ, पहा ताजे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजीच्या ग्राहकांनाही महागाईचा फटका बसला आहे. २६ मेपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मोहन कारंडे

CNG price hike

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजीच्या ग्राहकांनाही महागाईचा झटका बसला आहे. आज (दि. २६) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत सीएनजीचा दर ८३.०९ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. तर मुंबईतही दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, सध्याचा दर प्रति किलो ८४ रुपये झाला आहे.

१५ मेपासून आतापर्यंत सीएनजीच्या किमतीत सतत वाढ होत असून, अवघ्या ११ दिवसांत प्रति किलो ६ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. १५ मे रोजी २ रुपये, १८ मे रोजी १ रुपया, २३ मे रोजी १ रुपया आणि आज (दि. २६) पुन्हा २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा परिणाम

सीएनजीच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवण्याची शक्यता आहे. कारण, दिल्ली-एनसीआरमध्ये ऑटो, टॅक्सी, स्कूल व्हॅन आणि खासगी गाड्यांमध्ये सीएनजी हे सर्वाधिक वापरले जाणारे इंधन आहे. ऑटोरिक्षा चालकांच्या मते, सीएनजीच्या दरात वारंवार होणाऱ्या वाढीमुळे त्यांच्या दैनंदिन कमाईवर परिणाम होत आहे. इंधनाच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची आणि घरगुती बजेटवर दबाव येण्याची शक्यता आहे.

युद्धामुळे दरवाढ

मध्य-पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे इंधनाच्या किमती वाढत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणने लादलेल्या निर्बंधांचा परिणाम जलवाहतुकीवर होत आहे. गेल्या सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आली आणि अवघ्या एका दिवसानंतर आज सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT