MP student delivery in Class 10 board exam hall
मध्य प्रदेश: दहावीचा गणिताचा पेपर सुरू असताना, एका अल्पवयीन विद्यार्थिनीने परीक्षा केंद्रावरील स्वच्छतागृहात एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची घटना मंगळवारी घडली होती. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडलेल्या या घटनेतील अल्पवयीन विद्यार्थिनीबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका ओळखीच्या तरुणाने गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची आपबिती या पीडितेने पोलिसांना सांगितली.
धार जिल्ह्यातील एका खासगी शाळेत १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे केंद्र होते. संबंधित विद्यार्थिनी सकाळी गणिताचा पेपर सोडवण्यासाठी वर्गात बसली होती. सुमारे दोन तास पेपर लिहिल्यानंतर तिला अचानक तीव्र पोटदुखी जाणवू लागली. तिने शिक्षकांकडे विचारणा करून स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी घेतली. थोड्याच वेळात स्वच्छतागृहातून नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आल्याने शिक्षकांनी तिकडे धाव घेतली. तिथे विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
शाळा प्रशासनाने तातडीने '१०८' रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर विद्यार्थीनी आणि बाळाला जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. धारच्या मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. अनिता सिंघार यांनी सांगितले की, "प्राथमिक तपासणीनुसार बाळाचा जन्म ३४ व्या आठवड्यात झाला आहे. नवजात बालकाचे वजन सुमारे २ किलो असून बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, बाळ मुदतीपूर्व जन्मलेले असल्याने आणि वजन कमी असल्याने त्यांना विशेष उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे."
या घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधला. धक्कादायक म्हणजे, आपली मुलगी गरोदर आहे याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नव्हती, असा दावा तिच्या पालकांनी केला आहे. मुलीचे लग्न ठरले असून ती १८ वर्षांची झाल्यावर तिचे लग्न करून देणार होतो, असेही त्यांनी सांगितले. धारच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पारुल बेलापूरकर यांनी माहिती दिली की, "विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या गावातील एका तरुणाशी तिचे गेल्या दोन वर्षांपासून संबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी बलात्कार आणि 'पोक्सो' कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
गुरुवारी पालकांच्या उपस्थितीत झालेल्या चौकशीदरम्यान पीडितेने सांगितले की, २०२४ मध्ये एका गरबा कार्यक्रमादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर ती वडिलांच्या मोबाईलवरून त्या तरुणाशी संवाद साधत असे. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
आरोपीने पहिल्यांदा पीडितेला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिल्यानंतर तिला भाड्याच्या खोलीवर नेऊन तिच्यावर बळजबरी करण्यात आली. या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याने पीडितेला दिली होती. यानंतर आरोपीने तिला वारंवार फोन करून स्वतःच्या खोलीवर बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केले.
अल्पवयीन मुलीच्या गरोदरपणाबाबत पालकांना माहिती असूनही त्यांनी ती लपवली असल्यास, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. कायद्यानुसार, अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची माहिती असूनही ती लपवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र, पालकांना खरोखरच माहिती नव्हती हे सिद्ध न झाल्यास त्यांच्यावरील कारवाई कठीण असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.