CJP Parliament March Police Attack: कॉक्रोज जनता पार्टीने आपले आंदोलन पुन्हा सुरू केलं आहे. पार्टीतील प्रमुख नेते दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहचले असून तिथं अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेऊन काल पोलिसांनी आंदोलक मुलांवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला असा आरोप केला. त्यांनी १२ वर्षाच्या मुलींना पुरूष पोलिसांनी मारलं असा देखील आरोप केला. नेम बॅच हटवून पोलिसांनी आंदोलकांवर क्रूरपणे लाठीचार्ज केला. याचबरोबर पोलिसांनी शबाना आझमी सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली यांना घेऊन जाणाऱ्या गाडीवर देखील हल्ला केल्याचा आरोप केला.
कॉक्रोज जनता पार्टीच्या अधिकृत एक्स हँडलवर एक ट्विट केलं आहे. त्यात, 'कॉक्रोज जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपके, गीतांजली, अभिनेत्री आणि माजी खासदार शबाना आझमी आणि प्रकाश राज यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला.
सीजेपीचे प्रवक्ते रांका यांनी सांगितलं की, 'पोलिसांनी लाठीचा वापर केला. आमच्या तरूणांना मारहाण केली. त्यांना खुली सूट देण्यात आली आहे. तरूणांना रस्त्यावर घसटण्यात आलं. सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली मॅम यांचे केस ओढण्यात आळं. त्यांना घसटत ट्रकमधून बाहेर काढण्यात आलं. एका कार्यकर्त्याची तर बरगडी तोडण्यात आली. आम्हाला इतकी क्रूरता अपेक्षित नव्हती. दिल्ली पोलीसांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांना स्पष्ट आदेश होते की या लोकांना चिरडा.'
मात्र यामुळं आंदोलन अजून वाढलं आहे. जास्त संख्येनं लोकं दिल्लीत येत आहे. ते दिल्लीतून जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हलणार नाहीत.
रांका यांनी सांगितलं की जेपी नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावलं अन् आम्हाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. आम्हाला ५ तास थांबवून ठेवलं. सरकार जर चर्चा करू इच्छिते तर आता त्यांनी जंतर मंतरवर यावं.'
दरम्यान दिल्ली पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून त्यांनी सीजेपीचे सर्व आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत असं सांगितलं.
दिल्ली पोलिसांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, 'सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. गीतांजली यांच्या नावाने ज्या पोस्ट व्हायरल होत आहेत. १२ वर्षाच्या मुलीवर हल्ला केला गेला, केस ओढले गेले, डोक्याला मार लागला, ४० के ५० इतर आंदोलकांची डोकी फोडली ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे. या पोस्टमध्ये जो दावा केला जात आहे तो खरा नाही.'