CJP protest Delhi Saurav Das Ashutosh Ranka Ajinkya Shinde File Photo
राष्ट्रीय

CJP protest Delhi: सीजेपीच्या सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदेंना दिल्ली पोलिसांकडून अटक; जंतर-मंतरवर नेमकं काय घडलं?

'जंतर-मंतर' आंदोलनस्थळी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेतले आहे.

मोहन कारंडे

CJP protest Delhi

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील 'जंतर-मंतर' आंदोलनस्थळी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या सर्व कार्यकर्त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती सीजेपीचे रत्ना सिंह यांनी दिली.

एसआयआर प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपी आणि विरोधकांचे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने जंतर-मंतर हे अधिकृत आंदोलनस्थळ म्हणून रद्द केल्यानंतरही, मंगळवारी तेथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता.

सीजेपीचे कायदेशीर सल्लागार रत्ना सिंह यांनी 'एक्स'वर माहिती देताना पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. "पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणलेल्या आमच्या कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर प्रवेश आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना सकाळी एससीएम न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे," असे त्यांनी सांगितले.

तसेच, "जंतर-मंतरवर केवळ तिरंगा फडकवण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना तब्बल २४ तास वकिलांना भेटू दिले नाही किंवा अटकेचे कारणही स्पष्ट केले नाही. पहाटे ३ वाजता खासगी व्हॅनमधून त्यांना पोलीस ठाण्यात आणले गेले. दिल्ली पोलीस वरिष्ठांच्या बेकायदेशीर आदेशांनुसार बाहुले बनून काम करत आहेत," असा गंभीर आरोपही सिंह यांनी केला.

'गुन्हेगार मोकाट, शांततापूर्ण आंदोलकांवर कारवाई'

राजधानीतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवताना त्या म्हणाल्या कि, "दिल्लीत गुन्हेगार उघडपणे फिरत आहेत आणि सामान्य नागरिकांवर हल्ले करत आहेत; मात्र, दुसरीकडे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. पोलीस प्रशासन केवळ सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून काम करत असून कायद्याची पायमल्ली करत आहे," अशी टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT