CJI Suryakant slams fake social media posts
नवी दिल्ली: सोशल मीडियावर आपल्या नावाचा वापर करून पसरवण्यात येत असलेल्या एका चुकीच्या विधानाचा सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अत्यंत दुर्मिळ अशा या थेट प्रतिक्रियेत, सरन्यायाधीशांनी ते विधान पूर्णपणे नाकारले आहे.
सोशल मीडियावरील एका अकाउंटने सरन्यायाधीशांच्या नावावर खालील विधान (मूळ हिंदीत) खोट्या पद्धतीने खपवले होते. "जर एखाद्या समाजाने आपल्यामधून IAS, IPS, सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिलेले असतानाही तो समाज स्वतःला शोषित समजत असेल, तर दोष ब्राह्मणांचा नाही तर त्यांच्या स्वतःच्या मानसिकतेचा आहे.
'पीटीआय'ला (PTI) दिलेल्या निवेदनात सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे की, "एक बनावट विधान तयार करणे आणि ते देशातील सर्वोच्च न्यायिक पदाच्या नावावर खपवणे, हा अत्यंत अप्रामाणिकपणा, जाणूनबुजून केलेली सामाजिक प्रक्षोभकता आणि घटनात्मक मूल्यांचा अवमान आहे. हा “घृणास्पद, निर्लज्ज आणि खोडसाळ प्रकार आहे.
"असे बेजबाबदार वर्तन न्यायपालिकेवरील जनतेचा विश्वास आणि कायद्याच्या राज्याच्या मूळावरच घाला घालते." हे दावे पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करताना निवेदनात म्हटले आहे की, "हे आरोप पूर्णपणे निराधार, द्वेषपूर्ण आणि धादांत खोटे आहेत."
यासोबतच अफवा पसरवण्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करत निवेदनात म्हटले आहे की, "माननीय सरन्यायाधीशांचे कार्यालय सर्व जबाबदार नागरिक, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आवाहन करते की, त्यांनी अशा खोट्या आणि बनावट मजकुराचा प्रसार करू नये."