Justice Surya Kant slams a lawyer for offensive social media posts
नवी दिल्ली : "जे वकील आपल्या 'काळ्या कोटाचा' गैरवापर करतात, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे उघडू शकत नाहीत. आम्हाला याचिकाकर्त्याची वेबसाईट किंवा फेसबुक प्रोफाईल दाखवा. ते स्वतःला खूप हुशार समजतात आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या याचिकाकर्त्यालाही आमच्यासमोर हजर करा. जास्त ओव्हरस्मार्ट बनू नका, जणू काही आम्हाला काहीच माहित नाही!", अशा कडक शब्दांमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सोमवारी (२७ एप्रिल) एका वकिलाची कानउघडणी केली.
'बार अँड बेंच'च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठ मध्य प्रदेश स्टेट बार कौन्सिल निवडणुकीतील अपात्रतेला आव्हान देणाऱ्या काही वकिलांच्या याचिकांवर सुनावणी करत होते. सुधारित पात्रतेचे निकष पूर्ण न केल्यामुळे निवडणूक लढवण्यापासून रोखल्या गेल्याने या वकिलांनी याचिका दाखल केल्या होत्या.
सुनावणी दरम्यान खंडपीठानच्या निदर्शनास आले की, एका याचिकाकर्त्याने बार कौन्सिल निवडणुकीच्या देखरेखीसाठी कोर्टाने स्थापन केलेल्या समितीविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आहेत. या टिप्पण्यांची गंभीर दखल घेत कोर्टाने म्हटले की, याचिकाकर्त्याने चुकीचे, बिनबुडाचे आणि आक्षेपार्ह आरोप केले असून तो कोर्टाकडून कोणत्याही दिलासा मिळण्यास पात्र नाही.
खंडपीठाने स्पष्ट केले की, जे वकील आपल्या 'काळ्या कोटाचा' गैरवापर करतात, त्यांच्यासाठी कोर्टाचे दरवाजे उघडू शकत नाहीत. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, "आम्हाला या याचिकाकर्त्याची वेबसाईट किंवा फेसबुक प्रोफाईल दाखवा. त्याच्यावर फौजदारी अवमाननेची कारवाई का सुरू करू नये आणि त्याला तात्काळ अटक का करू नये, हे सांगा. ते स्वतःला खूप हुशार समजतात आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या याचिकाकर्त्यालाही आमच्यासमोर हजर करा. जास्त ओव्हरस्मार्ट बनू नका, जणू काही आम्हाला काहीच माहित नाही!"
"संबंधिताने न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि समितीच्या इतर सदस्यांविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे आणि बदनामीकारक आरोप केले आहेत. आम्ही ही याचिका १ लाख रुपयांच्या दंडासह फेटाळत आहोत, असेही यावेळी खंडपीठाने स्पष्ट केले.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी कोर्टाला सांगितले की, ज्या वकिलाने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, तो आता या प्रकरणाचा याचिकाकर्ता नाही. त्यांनी स्पष्ट केले की ती व्यक्ती आता या याचिकेचा भाग नाही आणि आम्ही त्याच्या विधानाचे समर्थन करत नाही. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टिप्पणी केली, "तो आता याचिकाकर्ता नाही कारण त्याला माहित आहे की आम्ही त्याला पकडले आहे."
दुसरे एक वकील सिद्धार्थ आर. गुप्ता यांनी कोर्टाला विनंती केली की, इतर याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारला जाऊ नये आणि सर्वांना एकाच तराजूमध्ये तोलू नये. मात्र, सरन्यायाधीश सयूकांत हा युक्तिवाद फेटाळून लावत म्हणाले की, "आम्हाला सवलत देण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. जे लोक व्यवस्थेचा गैरवापर करतात, त्यांच्यासाठी आम्ही मार्ग मोकळा करणार नाही."