नितीन गडकरी. (File Photo)
राष्ट्रीय

वाढत्या रस्ते अपघातांना सिव्हिल इंजिनिअर्स जबाबदार, FIR दाखल करा : नितीन गडकरी

Nitin Gadkari | वाढत्या रस्ते अपघातांबाबत व्यक्त केली चिंता

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या रस्ते अपघातांना सिव्हिल इंजिनिअर्स, सल्लागार आणि सदोष सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ते गुरुवारी नवी दिल्ली येथील ग्लोबल रोड इन्फ्राटेक समिट अँड एक्स्पो (GRIS) मध्ये बोलत होते. किरकोळ चुका आणि रस्त्याची खराब रचना अपघातांसाठी कारण ठरत आहेत. तरीही यासाठी कोणालाही जबाबदार धरलेले जात नाही, असेही गडकर म्हणाले.

रस्ते अपघातांमुळे जीडीपीचे नुकसान किती?

"वाढत्या रस्ते अपघातांच्या समस्येला तोंड द्यावे लागणे हे आपल्यासाठी चांगले नाही. देशात दरवर्षी ४ लाख ८० हजार रस्ते अपघात होतात. तर त्यात १ लाख ८० हजार मृत्यू होतात. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहेत. यापैकी ६६.४ टक्के मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. यामुळे जीडीपीचे ३ टक्के नुकसान झाले आहे. रस्ते अपघातात डॉक्टर, अभियंते आणि महत्त्वाच्या व्यक्ती, प्रतिभावान तरुणांचा मृत्यू होणे हे आपल्या देशासाठी खरोखरच मोठे नुकसान आहे," अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

'सर्व अपघातांना सिव्हिल इंजिनिअर्स दोषी'

रस्ते बांधणीबाबत नियोजनाचा अभाव आणि डिझाइनसाठी त्यांनी थेट सिव्हिल इंजिनिअर्सना जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की, "या सर्व अपघातांना सिव्हिल इंजिनिअर्स दोषी आहेत. पण मी यासाठी सर्वांना दोष देत नाही. पण १० वर्षांच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की जे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) बनवतात त्यांनाच प्रमुख दोषी ठरवावे लागले. त्यात हजारो चुका असतात. माझे मत आहे की हे असे अहवाल देणाऱ्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला पाहिजे," असे ते म्हणाले.

देशात १ लाख ८० हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू

देशात दरवर्षी ४ लाख ८० हजार रस्ते अपघात होतात. ज्यामुळे १ लाख ८० हजार मृत्यू होतात. तर सुमारे ४ लाख लोकांना गंभीर दुखापती होतात. या रस्ते अपघातांत सर्वाधिक नुकसान दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे होते, असेही गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले.

स्पेन, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांच्या तुलनेत भारतात रस्ते सूचना फलक आणि चिन्हांकन प्रणाली अपुरी असल्याचे त्यांनी नमूद केले. रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी त्यांनी उद्योगांना चांगले तंत्रज्ञान आणि शाश्वत बांधकाम साहित्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT