Humanoid Robot File Photo
राष्ट्रीय

Chinese Humanoid Robot: उसेन बोल्टपेक्षाही वेगवान? चिनी रोबोटने १०० मीटरचे अंतर ९.३९ सेकंदात पार केले, पाहा VIDEO

World Humanoid Robot Games 2026: चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्समध्ये एका ह्युमनॉइड रोबोटने धावण्याच्या शर्यतीत विक्रमी कामगिरी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

World Humanoid Robot Games 2026

बीजिंग : चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्समध्ये एका ह्युमनॉइड रोबोटने धावण्याच्या शर्यतीत विक्रमी कामगिरी केली आहे. ‘टियांगॉन्ग अल्ट्रा’ या रोबोटने १०० मीटर अंतर अवघ्या ९.३९ सेकंदांत पार केले. विशेष म्हणजे, ही वेळ जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट याच्या ९.५८ सेकंदांच्या जागतिक विक्रमापेक्षाही कमी आहे.

बीजिंग ह्युमनॉइड रोबोट इनोव्हेशन सेंटरने विकसित केलेल्या टियांगॉन्ग अल्ट्राने शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीत आपल्या शर्यतीत विजय मिळवला. सुरुवातीला मागे पडल्यानंतर त्याने शेवटच्या टप्प्यात जोरदार वेग घेत ‘ऑनर’ कंपनीच्या ‘लाइटनिंग’ रोबोटला मागे टाकले. लाइटनिंगने ही शर्यत ९.४७ सेकंदांत पूर्ण केली.

उसेन बोल्टने २००९ मध्ये बर्लिन येथे झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर शर्यत ९.५८ सेकंदांत पूर्ण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, रोबोट्सची ही कामगिरी बोल्टच्या विक्रमापेक्षा वेगवान ठरली.

शर्यत पूर्ण केल्यानंतर नियंत्रण सुटले

रोबोट्सने विक्रमी वेग गाठला असला तरी त्यांची धाव मानवी धावपटूसारखी सहज नव्हती. शर्यत पूर्ण केल्यानंतर टियांगॉन्ग अल्ट्राचे संतुलन बिघडले आणि तो बाजूला जोरात जाऊन पडला. त्यामुळे प्रेक्षकांना सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगावे लागले. दुसरीकडे, लाइटनिंग शर्यतीनंतर जमिनीवर कोसळला आणि त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. मात्र, या कामगिरीने गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्युमनॉइड रोबोटच्या तंत्रज्ञानातील प्रगती स्पष्ट झाली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या स्पर्धेत टियांगॉन्ग अल्ट्राने १०० मीटर अंतर २१.५० सेकंदांत पूर्ण केले होते.

स्पर्धेमध्ये १६ देशांतील २,०५६ रोबोट सहभागी

यंदाच्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट स्पर्धेमध्ये १६ देश आणि सहा खंडांमधील ६६६ संघांचे २,०५६ रोबोट सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या २८० संघांच्या तुलनेत यंदा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बीजिंगमधील नॅशनल स्पीड स्केटिंग ओव्हल येथे ही स्पर्धा सुरू असून ती बुधवारपर्यंत चालणार आहे. १०० मीटर धावण्यासह फुटबॉल, नृत्य आणि औद्योगिक कामांशी संबंधित विविध प्रकारच्या तब्बल ५१ स्पर्धांचा यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT