India-China Relation
भारत आणि चीनमधील सीमावाद अत्यंत जुना आहे. अनेकदा दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणावाची परिस्थितीही निर्माण झाली आहे. आता या प्रश्नी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा असून तो सोडवण्यासाठी वेळ लागेल.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २६ जून रोजी किंगदाओ येथे त्यांचे चिनी समकक्ष डोंग जून यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रस्ताव दिला होता की, भारत आणि चीनने एका संरचित आराखड्यानुसार हे गुंतागुंतीचे मुद्दे सोडवावेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांनी चीनच्या किंगदाओ या बंदर शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता आणि सौहार्द राखण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर चीनची प्रतिक्रिया विचारली असता, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या की, "चीन आणि भारताने सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधी (SR) यंत्रणा स्थापन केली आहे आणि चीन-भारत सीमा प्रश्नाच्या निराकरणासाठी राजकीय मापदंड व मार्गदर्शक तत्त्वांवर सहमती दर्शवली आहे."
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या की, चीन भारतासोबत सीमांकन चर्चा आणि सीमा व्यवस्थापनासह विविध मुद्द्यांवर संवाद कायम ठेवण्यास, सीमावर्ती भागांमध्ये शांततापूर्ण वातावरण राखण्यास आणि सीमापार देवाणघेवाण व सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे. याशिवाय, विशेष प्रतिनिधी (SR) स्तरावरील चर्चेच्या २३ फेऱ्या होऊनही सीमाप्रश्न सोडवण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल विचारले असता, माओ म्हणाल्या, "सीमेचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे आणि तो सोडवण्यासाठी वेळ लागतो."
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चेची २३ वी फेरी पार पडली होती. २०२० मध्ये भारत-चीन सीमा भागातील पश्चिम क्षेत्रात झालेल्या संघर्षानंतर विशेष प्रतिनिधी (SR) स्तरावरील ही पहिलीच बैठक होती.