Chhattisgarh Crime News : वाळू उपशावरून दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादाने छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात भयानक हत्याकांडाचे रूप घेतले. फॉर्च्युनर कारट्रक्समध्ये अडकवून, त्यावर पेट्रोल ओतून ती पेटवून देण्यात आली. तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून, मृतांमध्ये भाजप नेते भारत सिंह यांचाही समावेश आहे. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, भारत सिंह वाळू उपशाशी संबंधित वादात तडजोड करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्यासाठी आधीच रचलेल्या सापळ्यात ते अडकले. दरम्यान, मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी, सत्यप्रकाश त्रिपाठी आणि मन्नू त्रिपाठी या चार आरोपींना अटक केली आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोरिया जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या भागातील वाळू उपशाचे कंत्राट भारत सिंह यांच्या कुटुंबाला मिळाले होते. सोनहत, कैलासपूर, तेलिमुडा, बेलिया आणि छिंगुरा भागात वाळू वाहतूक आणि खाणकामाशी संबंधित 'बेकायदेशीर' वसुलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही गटांत तीव्र संघर्ष सुरू झाला. भारत सिंह यांचा गट आणि भाजप नेते मनोज त्रिपाठी यांचे कुटुंब यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून हा वाद धुमसत होता. त्रिपाठी कुटुंबाच्या मालकीचे टिपर ट्रक्स वैकुंठपूर येथे वाळू वाहतुकीसाठी वापरले जात होते. पैशांचे व्यवहार आणि वाळू उपशावरील वर्चस्वावरून हा वाद आणखी चिघळला होता.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सिंह आणि इतर लोक फॉर्च्युनर गाडीतून प्रवास करत होते, ती गाडी आरोपींनी घेरली. कारच्या पुढे आणि मागे ट्रक्स उभे करत सर्व मार्ग बंद करण्यात आले. यानंतर काही वेळातच गाडीला आग लावण्यात आली. या भीषण आगीत भारत सिंह यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. या हल्ल्यात ठार झालेल्या इतर दोन व्यक्तींमध्ये वीरेंद्र सिंह (ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला) आणि नागेंद्र सिंह (शिक्षक आणि भारत सिंह यांचे चुलत भाऊ) यांचा समावेश आहे. मयांक सिंह हा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
भारत सिंह हे आधी काँग्रेसमध्ये होते, परंतु भूपेश बघेल सरकारच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पीडित कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा हल्ला अचानक झालेला नसून पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेशा चौबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "प्राथमिक तपासानुसार त्रिपाठी आणि ठाकूर गटात वाळू उपशावरून जुना वाद होता. ठाकूर कुटुंबातील सदस्य रात्री ९:३० ते १० च्या सुमारास परिसरात पोहोचले, त्यानंतर त्यांच्यात वाद आणि हाणामारी झाली. याच दरम्यान फॉर्च्युनर गाडीला आग लावण्यात आली. चार आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचे मोबाईल फोन बंद असून ते फरार आहेत."