Chandranath Rath Murder Case: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि निकटवर्तीय सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात भाजपचेच दोन कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त करत सीबीआयने दोघांना अटक केली आहे. तपासात हे दोघे रथ यांच्यासोबत काम करत असल्याचे आणि त्यांचे एका प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाशीही संपर्क असल्याचे समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर सोनकर आणि साहिब सोनकर अशी आहेत. हे दोघेही चंद्रनाथ रथ यांच्या टीममध्ये काम करत होते. सीबीआयच्या माहितीनुसार, दोघांनाही कोलकात्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तपासादरम्यान सीबीआयला सागर सोनकर हा लँडलाइन फोनद्वारे एका प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्कात असल्याचे आढळले. त्या फोन कॉल्सच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, 2020 पूर्वी सागर सोनकर हा प्रतिस्पर्धी पक्षातील एका आमदारासोबत काम करत होता, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. त्यानंतर तो भाजपमध्ये दाखल झाला होता.
सीबीआयच्या तपासानुसार, 2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी शुभेंदू अधिकारी यांच्या निवडणूक मोहिमेतील महत्त्वाचे समन्वयक असलेल्या चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्याचा कट डिसेंबर 2025 पासून रचला जात होता. मात्र विविध कारणांमुळे तो वारंवार पुढे ढकलण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
सीबीआयच्या प्राथमिक तपासात सागर सोनकर याचे हल्लेखोरांशी संबंध असल्याचे काही पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. हत्या करण्यासाठी सुपारी घेणाऱ्या आरोपींना पैसे पुरवल्याचा आरोपही सागरवर आहे.
6 मे 2026 रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरात चंद्रनाथ रथ कारमधून प्रवास करत असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात सीबीआयने यापूर्वीच सहा हल्लेखोरांसह सुपारी स्वीकारणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीचा अद्याप शोध सुरू असून तपास सुरू असल्याचे सीबीआयने सांगितले आहे. सीबीआय या प्रकरणातील राजकीय संबंध, आर्थिक व्यवहार आणि कटाच्या संपूर्ण सूत्रधाराचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.