भारत-पाक सीमेवर ड्रोनमधून टाकले शस्त्रांचे पॅकेट; ४ पिस्तुले अन् हेरॉईन जप्त file photo
राष्ट्रीय

भारत-पाक सीमेवर ड्रोनमधून टाकले शस्त्रांचे पॅकेट; ४ पिस्तुले अन् हेरॉईन जप्त

खालडा सेक्टरअंतर्गत येणाऱ्या कलसियां गावात बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही मोठी जप्ती केली.

पुढारी वृत्तसेवा

chandigarh punjab punjab 4 pistols 57 bullets 277g heroin recovered near india pakistan border

पुढारी ऑनलाईन : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली शस्त्रे आणि हेरॉईनची खेप सुरक्षा यंत्रणांनी जप्त केली आहे. या कारवाईत चार पिस्तुले आणि २७७ ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आले आहेत. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील कलसियां गावात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ सुरक्षा यंत्रणांनी ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली शस्त्रे आणि अंमली पदार्थांची खेप जप्त केली आहे. खालडा सेक्टरअंतर्गत येणाऱ्या कलसियां गावात बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही मोठी जप्ती केली.

सुरक्षा दलांना एक संशयास्पद पॅकेट आढळून आले. हे पॅकेट ड्रोनच्या माध्यमातून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये चार पिस्तुले, सहा मॅगझिन, ५७ जिवंत काडतुसे आणि २७७ ग्रॅम हेरॉईन आढळून आले.

प्राथमिक तपासात शस्त्रे आणि हेरॉईनची ही खेप पाकिस्तानच्या दिशेने ड्रोनच्या माध्यमातून भारतीय हद्दीत पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीमेपलीकडून शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे या जप्तीकडे सुरक्षा यंत्रणा गांभीर्याने पाहत आहेत.

या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही खेप कोणी पाठवली आणि भारतीय हद्दीत ती कोणापर्यंत पोहोचवली जाणार होती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा स्रोत आणि तस्करीच्या नेटवर्कचाही तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT