श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय यांचा राजीनामा स्वीकारला असून कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. Pudhari
राष्ट्रीय

Ram Mandir Donation Row : अखेर चंपत राय यांचा राजीनामा मंजूर; कृष्ण मोहन राम मंदिर ट्रस्टचे नवे हंगामी सरचिटणीस

देणगीत आलेल्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्‍याचा गोविंद गिरींचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Ram Mandir Donation Row : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आज (दि. ६ जुलै) सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर करण्‍यात आला आहे. कथित देणगी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी ट्रस्टने नवनियुक्त विश्वस्त कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली असून, संपूर्ण प्रशासनाचा नव्याने आढावा घेण्याची घोषणा केली आहे.

चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले

'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ची एक महत्त्वपूर्ण आणि प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ वकील के. परासरन यांनी ट्रस्टच्या घटनेतील तरतुदींचा हवाला देत स्पष्ट केले की, राजीनामा सादर केल्याबरोबर तो आपोआप प्रभावी ठरतो आणि तो फेटाळण्याचा कोणताही पर्याय ट्रस्टकडे नसतो. त्यानंतर, दोन्ही राजीनामे एकमताने स्वीकारण्यात आले.

आम्ही सर्वजण दुखावलो गेलो

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी या वादामुळे संस्थेला मोठा धक्का बसल्याचे मान्य केले. "या प्रकारामुळे आम्ही सर्वजण दुखावलो गेलो आहोत आणि आम्हाला तीव्र दुःख झाले आहे. चोरी लहान होती की मोठी, हा दुय्यम भाग आहे. पण येथे असे वातावरण निर्माण होऊ दिले गेले, याचेच आम्हाला जास्त वाईट वाटत आहे," असे ते म्हणाले.

'देणगीत आलेल्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित'

मंदिराला देणगी म्हणून मिळालेल्या मौल्यवान वस्तूही गायब झाल्याच्या आरोपांचे गोविंद गिरी यांनी पूर्णपणे खंडन केले."आम्ही या सर्व वस्तूंची नोंद असलेली नोंदवही (रजिस्टर) सोबत आणली आहे. आमच्याकडे सुमारे २,८०० देणगी वस्तूंची यादी असलेले रजिस्टर आहे आणि त्यातील प्रत्येक वस्तू पूर्णपणे सुरक्षित आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.ज्या पाच वस्तूंबद्दल जाहीरपणे चर्चा सुरू होती, त्या वस्तू ट्रस्टने नमुना (सँपल) म्हणून दाखवल्या असून, देणगीतील प्रत्येक वस्तूचा हिशोब अचूक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

पत्रकार परिषदेत ट्रस्टकडून देणगीच्या वस्तूंचे प्रदर्शन

मंदिराला देणगी म्हणून मिळालेल्या मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे आरोप खोडून काढण्यासाठी, ट्रस्टने बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मौल्यवान वस्तूंचे थेट प्रदर्शन केले. प्रसारमाध्यमांसमोर ठेवलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचे रामायण, प्रभू रामांच्या प्रतीकात्मक पाऊलखुणा, एक हार आणि कागभुशुंडी यांची मूर्ती यांचा समावेश होता. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या त्या वस्तू आहेत ज्या गायब झाल्याचा आरोप केला जात होता.गोविंद गिरी यांनी पुनरुच्चार केला की, ट्रस्टकडे सुमारे २,८०० देणगी वस्तूंचे रजिस्टर असून प्रत्येक वस्तूचा हिशोब उपलब्ध आहे."आम्ही या सर्व वस्तूंची नोंद असलेले रजिस्टर आणले आहे. आमच्याकडे २,८०० देणगी वस्तूंची यादी असलेले रजिस्टर आहे आणि त्या सर्व सुरक्षित आहेत. आम्ही या वस्तू केवळ नमुना म्हणून दाखवल्या आहेत. देणगीतील सर्व वस्तू सुरक्षित आहेत," असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

ट्रस्टच्या नियमांनुसार राजीनामे मंजूर

स्वामी गोविंद गिरी यांनी सांगितले की, चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी बैठकीपूर्वीच आपले राजीनामे सादर केले होते.त्यांच्या सांगण्यानुसार, जोपर्यंत कथित चोरीला कारणीभूत असलेले दोषी शोधले जात नाहीत आणि त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत सरचिटणीस पदावर राहणे योग्य नाही, असे चंपत राय यांना वाटले. चंपत राय यांना खूप मानसिक त्रास झाला होता. जोपर्यंत गुन्हेगार पकडले जात नाहीत आणि त्यांना योग्य ती शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत पदावर राहणे योग्य ठरणार नाही, असे त्यांना वाटले," असे गोविंद गिरी यांनी सांगितले.

ट्रस्टकडे फारसे पर्याय नव्हते

या प्रकरणात ट्रस्टकडे फारसे पर्याय नव्हते, कारण ट्रस्टच्या घटनेनुसार राजीनामा सादर केल्या क्षणापासूनच तो लागू होतो."एकदा राजीनामा दिल्यानंतर, तो स्वीकारायचा की फेटाळायचा हा निर्णय आमच्या हातात उरत नाही. ट्रस्टच्या घटनेनुसार, तो त्वरित स्वीकारला गेला असे मानले जाते. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता," असे ते म्हणाले.यावेळी गोविंद गिरी यांनी राम मंदिर आंदोलनातील चंपत राय यांच्या योगदानाचा गौरव केला."त्यांनी सुरुवातीपासूनच राम मंदिर उभारणीसाठी काम केले आहे. त्यांच्या वर्षांच्या सेवेचा आणि या कठीण परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या मोठेपणाचा आदर ठेवून आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे," असेही त्यांनी सांगितले.

कृष्ण मोहन यांच्याकडे हंगामी सरचिटणीसपद

ट्रस्टने पुढील व्यवस्था होईपर्यंत सरचिटणीसपदाची जबाबदारी नवनियुक्त विश्वस्त कृष्ण मोहन यांच्याकडे सोपवली आहे.गोविंद गिरी यांनी सांगितले की, 'एसआयटी'च्या (SIT) निष्कर्षांची पडताळणी केल्यानंतर पुढील बैठकीत प्रशासकीय नियुक्त्यांचा निर्णय घेतला जाईल.

कोण आहेत कृष्‍ण मोहन?

कृष्ण मोहन हे महाराष्ट्र कॅडरचे सेवानिवृत्त भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी आहेत. उत्तर प्रदेशातील हरडोई जिल्ह्यातील चंद्रपूर गावचे रहिवासी असलेले कृष्ण मोहन हे सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT