CJI Surya Kant File Photo
राष्ट्रीय

CJI Surya Kant : कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी वैयक्तिक असू शकत नाही; सरन्यायाधीश सूर्यकांत असं का म्‍हणाले?

सुनावणीत तोंडी स्वरूपात मांडलेल्या बाबी न्यायालयाचा अंतिम निकाल नसतो

पुढारी वृत्तसेवा

CJI Surya Kant statement : न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेली वक्तव्ये किंवा टीपा ही त्यांची वैयक्तिक मते नसतात, असे अत्यंत महत्त्वाचे विधान भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केले आहे. पीठ सांभाळताना एक न्यायाधीश आपली वैयक्तिक विचारसरणी आणि मते पूर्णपणे बाजूला ठेवतो. त्यामुळे सुनावणीत तोंडी स्वरूपात मांडलेल्या बाबी ही न्यायाधीशांची वैयक्तिक मत नसते आणि तो न्यायालयाचा अंतिम निकालही नसतो, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

न्यायाधीश तिखट प्रश्न का विचारतात?

पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथील वकिलांच्या प्रतिनिधींशी 'लीगल एड डिफेन्स कौन्सिल' योजनेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करताना कोर्टरूममधील युक्तिवादाचे महत्त्व सांगताना सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायाधीश अनेकदा तिखट प्रश्न विचारतात, तात्पुरत्या टिप्पण्या करतात किंवा एखादी काल्पनिक परिस्थिती समोर मांडतात. वकिलांच्या युक्तिवादातील खोली तपासण्यासाठी आणि संपूर्ण प्रकरणाची स्पष्टता मिळवण्यासाठीच हे केले जाते.

दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन तपासणे न्यायिक प्रक्रियेची गरज

"हा 'कोर्टरूम क्राफ्ट'चा (न्यायालयीन प्रक्रियेचा) एक भाग आहे. अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन पूर्णपणे तपासून पाहणे ही न्यायिक प्रक्रियेची गरज असते," असे सरन्यायाधीशांनी नमूद केले.

न्यायालयांची भाषा ही त्यांचे निकाल असतात

न्यायालयीन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, खटल्यांची सुनावणी करताना आणि निकाल देताना न्यायाधीश केवळ संविधान आणि कायद्यालाच उत्तरदायी असतात. अत्यंत तटस्थ राहूनच निकाल दिले जातात. न्यायालये ही अंतिम त्यांच्या आदेश आणि निकालांतूनच बोलतात. तोंडी युक्तिवाद हे केवळ मुद्द्यांची सखोल उकल करण्यासाठी आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे साधन आहेत, असेही सरन्‍यायाधीशांनी स्‍पष्‍ट केले.

... तर चुकीचा संदेश पसरु शकतो

सुनावणीदरम्यान बोलल्या गेलेल्या एखाद्या वाक्याचा किंवा शब्दाचा संदर्भाशिवाय विचार केला, तर त्यातून चुकीचा संदेश किंवा गैरसमज पसरू शकतो, असा इशारा देत अर्थपूर्ण संवादांमुळे गैरसमज दूर होतात, संस्था बळकट होतात आणि निष्पक्षता व संविधानाच्या चौकटीत राहून वेगवेगळ्या दृष्टिकोनांमध्ये सुसंवाद साधणे शक्य होते, असेही सरन्‍यायाधीशांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT