Bans 5 OTT Platforms After ULLU & ALTBalajI: ऑनलाइन मनोरंजनाच्या नावाखाली सुरु असलेल्या अश्लील अॅप्स/वेबसाइट्सवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने पाच OTT प्लॅटफॉर्म्स पूर्णपणे ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या प्लॅटफॉर्म्सवर थेट नग्नता आणि लैंगिक दृश्यांवर आधारित मजकूर प्रसारित केला जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सरकारला तपासणीत आढळून आलं की MoodXVIP, Koyal Playpro, Digi Movieplex, Feel आणि Jugnu या अॅप्स/वेबसाइट्सवर लैंगिक संबंध दाखवणारे सीन आणि फक्त उत्तेजक कंटेंटचाच भडिमार सुरू होता. यात भारतीय कायद्यांचं उल्लंघन होत असल्याने हे प्लॅटफॉर्म्स तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69A अंतर्गत करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार नैतिकता, सामाजिक सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय हिताला धोका निर्माण करणारा मजकूर इंटरनेटवरून हटवण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्याचबरोबर डिजिटल मीडिया एथिक्स कोड नियम 2021 चाही आधार घेण्यात आला आहे. सरकारने सर्व इंटरनेट सेवा पुरवठादारांना स्पष्ट आदेश दिले आहेत की हे प्लॅटफॉर्म्स कोणत्याही मोबाईल, टीव्ही किंवा वेब ब्राउझरवर उपलब्ध राहू नयेत.
महत्त्वाचं म्हणजे हा पहिलाच इशारा नव्हता. सप्टेंबर 2024 पासून संबंधित प्लॅटफॉर्म्सना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. काहींनी त्याकडे दुर्लक्ष केलं, तर काहींनी डोमेन बदलून पुन्हा तोच कंटेंट सुरू ठेवला. मार्च 2024 आणि फेब्रुवारी 2025 मध्येही अशाच प्रकारच्या कारवाया झाल्या होत्या. मात्र वारंवार सूचना देऊनही सुधारणा न केल्यामुळे यावेळी थेट बंदीचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाआधी गृह मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालय, कायदा मंत्रालय तसेच उद्योग संघटना आणि महिला-बाल हक्क क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. सर्वांचा एकच सूर होता की, अशा स्वरूपाचा कंटेंट समाजासाठी घातक असून तो तात्काळ थांबवणं आवश्यक आहे.
याआधीही सरकारने मोठी कारवाई केली होती. जुलै 2025 मध्ये 25 OTT अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या, ज्यात ULLU आणि ALTBalaji यांचाही समावेश होता.
सरकारचा स्पष्ट मेसेज आहे की, डिजिटल प्लॅटफॉर्म्सला स्वातंत्र्य आहे, पण बेजबाबदारपणा नाही. मुलं, महिला आणि एकूणच समाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कंटेंट तयार केला गेला पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर पुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांच्या मते, वारंवार नाव बदलून किंवा नवे अॅप्स काढून अश्लील मजकूर दाखवण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद केला जाणार आहे.