Jharkhand, Karnataka, Andhra Pradesh Railway Projects
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने भारतीय रेल्वेच्या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत ६ हजार ४०५ कोटी आहे. या प्रकल्पांमध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमधील ३१८ किमी लांबीचे रेल्वे जाळे तयार केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
1. कोडरमा – बरकाकाना दुहेरीकरण (१३३ किमी) – झारखंडमधील महत्त्वाच्या कोळसा उत्पादक क्षेत्रातून जाणारा हा रेल्वे मार्ग आहे. बिहारच्या पाटणा आणि झारखंडची राजधानी रांचीमधील सर्वात कमी अंतराचा रेल्वे दुवा आहे.
2. बल्लारी – चिक्कजाजूर दुहेरीकरण (१८५ किमी) – हा प्रकल्प कर्नाटकातील बल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमधून तसेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री वैष्णव यांनी दिली.
या प्रकल्पांमुळे १,४०८ गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे २८.१९ लाख लोकांना सुलभ आणि जलद वाहतूक सुविधा मिळणार.
४९ मिलियन टन प्रतिवर्ष अतिरिक्त मालवाहतूक करण्याची क्षमता तयार होणार आहे.
प्रकल्पाद्वारे कोळसा, लोखंड, सिमेंट, खते, शेतीमाल, पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या मालाच्या वाहतुकीला गती मिळेल, असे वैष्णव म्हणाले.
रेल्वेचे आगामी दोन्ही प्रकल्प पंतप्रधान मोदींच्या ‘पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत एकात्मिक नियोजनाच्या माध्यमातून अंमलात आणले जात आहेत. त्यामुळे केवळ वाहतूक सुधारणा नव्हे तर स्थानिक विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले.