नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने साठ्यासाठी ३० दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकार रब्बी हंगामात हा गहू खरेदी करेल. केंद्राने राज्याच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर हे लक्ष्य निश्चित करण्यात आले. तर, हे लक्ष्य गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टन कमी आहे. (Wheat Purchase)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी ३० दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारचे हे लक्ष्य उत्पादनासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा खूपच कमी आहे. कृषी मंत्रालयाने २०२४-२५ पीक वर्षात (जुलै-जून) ११५ दशलक्ष टन विक्रमी गहू उत्पादनाचे लक्ष्य ठेवले होते. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ रब्बी हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत २,४२५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि राज्य संस्था शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी आणि कल्याणकारी योजनांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी गहू खरेदी करतात. (Wheat Purchase)
केंद्र सरकारने २०२४-२५ दरम्यान ३०-३२ दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु केवळ २६.६ दशलक्ष टन खरेदी करण्यात आले होते. तर २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारने ३४.१५ दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु या काळात फक्त २६.२ दशलक्ष टन खरेदी करता आली. २०२२-२३ या वर्षात, खरेदी खूपच कमी करण्यात आली होती. या कालावधीत ४४.४ दशलक्ष टन उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. तर फक्त १८.८ दशलक्ष टन खरेदी करता आले. या वर्षी, रब्बी हंगामात अनेक राज्यांमध्ये गव्हाची पेरणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ३१.९ दशलक्ष हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. कृषी मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, सध्याचा काळ पीक परिस्थितीसाठी अनुकूल आहे. गेल्या दोन वर्षांत, कापणीच्या हंगामात तीव्र उष्णतेमुळे भारतातील गहू उत्पादनावर परिणाम झाला होता.