

कॅनबेरा : आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा नेहमीच पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही मोठा उपयोग झालेला आहे. ‘नासा’ या अमेरिकन अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजातीही विकसित केलेली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढू शकते. नासाच्या प्रयोगात रोपे सतत सूर्यप्रकाशात राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाट्याने होते.
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की जलद वाढ तंत्र वापरताना त्यात गहू, चवळी व बार्ली यांची सहा पिढ्यांतील रोपे, तर कॅनोलाची चार पिढ्यांतील रोपे एका वर्षांत वाढवण्यात आली. यात विशिष्ट प्रकारचे काचगृह वापरण्यात आले होते. नियंत्रित वातावरणात वाढवण्यात आलेल्या प्रयोगात सूर्यप्रकाश भरपूर ठेवला होता. 2050 पर्यंत जगात अन्नधान्य उत्पादनात 60 ते 80 टक्के वाढ केली तरच लोकांना अन्न मिळू शकणार आहे. त्यामुळे उत्पादनवाढीच्या या प्रयोगाला महत्त्व आहे. 2050पर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्ज असणार आहे. अधिक वेगाने वनस्पतींची वाढ करण्याचे प्रयोग हे संशोधनात केले जात होते ते आता प्रत्यक्ष वापरात आणण्याची वेळ आली आहे. डो अॅग्रोसायन्सेस बरोबर भागीदारीत हे तंत्र वापरून गव्हाची डीएस फॅरेडे ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली आहे. ‘डीएस फॅरेडे’ ही जास्त प्रथिने असलेली गव्हाची प्रजाती असून, त्यामध्ये लवकर अंकुरण होते. या गव्हात काही जनुके समाविष्ट करण्यात आली असून, त्यामुळे ही प्रजाती जास्त ओलसर हवामानातही टिकते. ऑस्ट्रेलियात गेल्या चाळीस वर्षांपासून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अॅमी वॉटसन यांनी याबाबतचे संशोधन केले असून, त्याची माहिती ‘नेचर प्लँट्स’ या नियतकालिकात देण्यात आली आहे.