mobile recharge price hike
मोबाईल फोन कॉलचे दर वाढवण्याच्या निर्णयावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.  File Photo
राष्ट्रीय

मोबाईल कॉल दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार: काँग्रेस संतप्त

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मोबाईल कंपन्यांच्या फोन कॉलचे दर वाढवण्याच्या निर्णयावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. यासाठी त्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोबाईल कंपन्यांनी फोन कॉलचे दर वाढवून देशातील मोबाईल ग्राहकांवर वार्षिक ३४, ८२४ कोटी रुपयांचे ओझे टाकले आहे. मात्र, मोबाईल कंपन्यांच्या या निर्णयावर सरकार गप्प आहे. मोबाईल कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे सरकारला जड जात आहे. याप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उत्तर मागितले आहे.

रिलायन्स जिओ, एअरटेलचे मार्केटवर वर्चस्व

काँग्रेसचे सरचिटणीस सुरजेवाला म्हणाले की, “३ जुलैपासून देशात मोबाईल फोनकॉलचे दर वाढले आहेत. हे दर वाढल्याने १०९ कोटी मोबाईल ग्राहकांवर आर्थिक ओझे वाढले. अनेक मोबाइल ग्राहक रिलायन्स जिओ, व्होडाफोन आणि एअरटेल कंपन्यांचे नेटवर्क वापरतात. देशातील मोबाईल नेटवर्क मार्केटमधील हे तीन प्रमुख ऑपरेटर आहेत. यामध्ये रिलायन्स जिओचे ४८ कोटी ग्राहक आहेत. तर एअरटेलचे 39 कोटी आणि व्होडाफोन आयडियाचे 22.37 कोटी ग्राहक आहेत. मोबाईल नेटवर्क मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेलच्या वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. याचा अर्थ या दोन कंपन्यांचे मार्केटवर वर्चस्व आहे.”

केंद्र सरकारकडून एकतर्फी वाढ करण्याची परवानगी का?

सुरजेवाला यांनी केंद्र सरकारला प्रश्न केला की, “मोदी सरकारने खाजगी मोबाइल ऑपरेटर कंपन्यांना कोणत्याही नियम किंवा देखरेखीशिवाय वार्षिक ३४८२४ कोटी रुपयांनी सेलफोन कॉलच्या दरात एकतर्फी वाढ करण्याची परवानगी का दिली? सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांनी १०९ कोटी सेलफोन ग्राहकांवर कॉलच्या दराचे ओझे लादले असताना सरकार काय करत आहे? लोकसभा निवडणूक आटोपून केवळ एक महिनाच झाला असताना मोबाईल कंपन्यांनी दर वाढवून ग्राहकांना लुटले असून केंद्र सरकार मौन बाळगून आहे,” असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.

राहुल गांधींनी घेतली लोको पायलटची भेट

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काही लोको पायलट्सची भेट घेतली. त्यांनी लोको पायलटकडून ट्रेन ऑपरेशन्सची माहिती घेतली. यादरम्यान लोको पायलट यांनी राहुल गांधींना त्यांच्या समस्याही सांगितल्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधींनी लोको पायलटना सांगितले की, ते सातत्याने रेल्वेचे खाजगीकरण आणि नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

SCROLL FOR NEXT