Census 2027 India
नवी दिल्ली: देशाच्या जनगणना २०२७ मध्ये एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. दीर्घकाळ एकत्र राहणाऱ्या किंवा 'स्टेबल युनियन'मध्ये असलेल्या लिव्ह-इन जोडप्यांना विवाहित जोडपे म्हणून नोंदवले जाणार आहे. केंद्र सरकारच्या जनगणना पोर्टलवरील FAQ मध्ये याबाबत प्रथमच स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जर संबंधित जोडपे स्वतःचे नाते स्थिर मानत असेल, तर त्यांची नोंद विवाहित म्हणूनच केली जाईल, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
जनगणनेदरम्यान लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांची नोंद कशी होणार, या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, संबंधित जोडपे जर त्यांच्या नात्याला ‘स्थिर’ मानत असतील, तर त्यांना विवाहित म्हणून गणले जाईल. यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये अशा जोडप्यांनी स्वतःला विवाहित म्हणून घोषित केल्यास तशी नोंद केली जात होती, परंतु अधिकृतपणे यावर स्पष्टीकरण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
घरगुती यादीकरण टप्प्यात विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांपैकी ‘घरातील विवाहित जोडप्यांची संख्या’ हा एक महत्त्वाचा प्रश्न असेल. हा टप्पा ४५ दिवसांचा असून, प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशानुसार १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. या ४५ दिवसांपैकी सुरुवातीचे १५ दिवस ‘स्व-नोंदणी’ साठी राखीव असतील, तर पुढील ३० दिवस प्रत्यक्ष गणकांकडून माहिती संकलन केले जाईल.
जनगणनेत उत्तर देताना कोणत्याही कागदपत्रांची सक्ती नसते. नागरिकांनी त्यांच्या माहितीनुसार आणि प्रामाणिक विश्वासावर आधारित माहिती द्यायची असते, आणि ती तशीच नोंदवणे गणकांवर बंधनकारक असते.
यावेळच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जाणार आहे. नागरिकांना वेब पोर्टलद्वारे माहिती भरता येईल, ज्यासाठी ओटीपी आधारित पडताळणी केली जाईल. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती किंवा कोणताही जबाबदार प्रौढ सदस्य ही माहिती भरू शकेल. विशेष म्हणजे, घराचे अचूक लोकेशन नोंदवण्यासाठी 'जिओ-टॅगिंग' आधारित नकाशाचा वापर करावा लागणार आहे.