Pakistan fairness creams alert File Photo
राष्ट्रीय

Pakistan fairness creams alert: तजेलदार त्वचेच्या नादात आरोग्याशी खेळ; पाकिस्तानच्या 'या' २ फेअरनेस क्रीम्सवर भारतात बंदी

पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या अनधिकृत सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीबाबत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) नुकताच एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pakistan fairness creams alert

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या अनधिकृत सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीबाबत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) नुकताच एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. CDSCO ने जारी केलेल्या सूचनेनुसार, 'चांदनी व्हाईटनिंग क्रीम' आणि 'गोरी ब्यूटी क्रीम' या पाकिस्ताननिर्मित दोन 'फेअरनेस क्रीम्स'वर बंदी सदृश इशारा देण्यात आला आहे.

घातक विषारी धातूंचा समावेश

या दोन उत्पादनांच्या विक्रीबाबत इशारा देताना, औषध नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, या क्रीम्समध्ये निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात 'जड धातू' आढळून आले आहेत. या घटकांमुळे शरीरावर विषारी परिणाम होऊ शकतात, तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

CDSCO ची अधिकृत सूचना

"नागरिकांद्वारे वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यांचे उत्पादन आणि आयात 'औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४०' आणि 'सौंदर्यप्रसाधने नियम, २०२०' अंतर्गत नियंत्रित केले जाते. या उत्पादनांचे मानके भारतीय मानक ब्यूरो कडून निश्चित केले जातात. कोणत्याही सौंदर्यप्रसाधनाची विक्री किंवा वितरणासाठी राज्य परवाना प्राधिकरणाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच आयातीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे."

नागरिकांना आणि ग्राहकांना आवाहन

'गोरी ब्यूटी क्रीम' आणि 'चांदनी व्हाईटनिंग क्रीम' या अनधिकृत उत्पादनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी ही किंवा यांसारख्या नावांची उत्पादने खरेदी करू नयेत आणि खरेदी केली असल्यास त्यांचा वापर त्वरित थांबवावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

याशिवाय, नागरिकांनी नेहमी परवाना क्रमांक, उत्पादकाचा पत्ता, बॅच नंबर, निर्मिती व समाप्ती तारीख आणि आयात केलेल्या उत्पादनांवर नोंदणी क्रमांक असलेल्या अधिकृत सौंदर्यप्रसाधनांचीच खरेदी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT