BJP MLA Daughter Slaps Police Office Pudhari
राष्ट्रीय

Viral video: मंदिरात रांगेत उभं राहण्यावरून वाद; भाजप आमदाराच्या मुलीने महिला PSIला मारली चापट, CCTV फुटेज समोर

BJP MLA Daughter Slaps Police Officer: कर्नाटकातील एका मंदिरात प्रवेशावरून भाजप आमदाराच्या मुलीचा आणि महिला PSI चा वाद झाला असून, या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

BJP MLA Daughter Slaps Police Officer: कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील एका मंदिरात भाजप आमदाराच्या मुलीचा आणि महिला पोलीस उपनिरीक्षकाचा वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे CCTV फुटेजही समोर आले असून, त्यात भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या आणि महिला PSI सविता बी. पाटील यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे.

वादादरम्यान ऐश्वर्याने महिला पोलीस अधिकाऱ्याला चापट मारल्याचा आरोप आहे. ही घटना 12 ऑगस्ट रोजी आरती उक्कडा मंदिरात घडली होती. काही दिवसांनंतर या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, भीम अमावास्येच्या उत्सवादरम्यान सायंकाळी सुमारे 4.30 वाजता ही घटना घडली. मंदिरात मोठी गर्दी असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मांड्या महिला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या PSI सविता बी. पाटील यांची मंदिरात गर्दी नियंत्रणाची जबाबदारी होती. ऐश्वर्या काही जणांसोबत मंदिरात आली होती. तिने रांगेत न थांबता थेट गर्भगृहात जाण्याची परवानगी मागितल्याचा आरोप आहे.

यावेळी PSI सविता पाटील यांनी काही मिनिटे थांबण्यास सांगितले. रांगेत असलेल्या इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून थोडी प्रतीक्षा करण्याची विनंती त्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

‘मी आमदाराची मुलगी आहे...’ असे सांगत वाद वाढल्याचा आरोप

पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, ऐश्वर्याने आपण आमदाराची मुलगी असल्याचे सांगत तिला का रोखले जात आहे, असा सवाल केला. यानंतर दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला.

CCTV फुटेजमध्ये दोघी एकमेकींशी जोरदार वाद घालताना दिसत आहेत. ऐश्वर्या फोनवरून कोणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे, त्यानंतर तिने महिला PSI ला चापट मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर PSI सविता पाटील यांनीही प्रत्युत्तरादाखल ऐश्वर्याला मारल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी तातडीने हस्तक्षेप करत दोघींना बाजूला केले.

सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याप्रकरणी FIR

या घटनेनंतर PSI सविता बी. पाटील यांनी क्यातनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ऐश्वर्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि धमकी देणे अशा आरोपांखाली FIR नोंदवण्यात आला आहे.

ऐश्वर्याचीही पोलिसांविरोधात तक्रार

दरम्यान, ऐश्वर्यानेही महिला पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. PSI सविता पाटील यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी सांगितले की, ऐश्वर्याच्या प्रतितक्रारीतील आरोपांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या तक्रारींची तपासणी सुरू आहे.

‘मुलीची चूक असेल तर कारवाई व्हावी’; आमदाराचे वक्तव्य

या प्रकरणावर भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलीकडून चूक झाली असेल, तर कायद्यानुसार दोषी व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

ऐश्वर्या दोन लहान मुलांसोबत मंदिरात गेली होती. रांगेत जास्त वेळ थांबल्यास मुलांना त्रास होऊ शकतो, म्हणून तिने काही वेळासाठी आत जाण्याची परवानगी मागितली होती, असेही आमदाराने सांगितले. मात्र, राजकीय कुटुंबातील सदस्य म्हणून आपल्या मुलीने अधिक संयमाने वागायला हवे होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मंदिरात VIP व्यवस्था नको

बी. सुरेश गौडा यांनी या घटनेनंतर मंदिरांमधील VIP व्यवस्थेलाही विरोध केला. मंदिरात सर्व भाविकांना समान वागणूक मिळाली पाहिजे आणि सर्वांनी एकाच रांगेतून दर्शन घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

अशी व्यवस्था केल्यास सामान्य भाविकांना त्रास होणार नाही आणि पोलिसांवरील गर्दी नियंत्रणाचा ताणही कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी सुरू असून, पुढील तपासानंतर या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT