नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा: अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. आता या विद्यार्थ्यांना आणि डमी शाळांना आळा घालण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पाऊल उचलले आहे. अशा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसू देणार नाही. यासंबंधीच्या नियमाची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचे समजते. डमी शाळांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. या नियमामुळे परीक्षेला मुकलेले विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (एनआयओएस) द्वारे आयोजित परीक्षा देऊ शकतील. (CBSE News)
सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीएसईच्या पथकाद्वारे संलग्नित शाळांची अचानक तपासणी केली जाते. या तपासणीवेळी विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच विद्यार्थांची ही गैरहजेरी सततची असेल. तर बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसू दिले जाणार नाही. यासंबंधीच्या उपनियमांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल केले जाण्याची तयारी सुरु आहे. नियमित शाळेत न गेल्यामुळे परीक्षेला बसता आले नाही. तर जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर आणि त्याच्या पालकांवर असेल. सीबीएसईच्या नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीत हा निर्णय शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे समजते.
सीबीएसईच्या अगोदरपासूनच्या नियमांनुसार, बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. यासोबतच आता नवीन निर्णय लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार डमी शाळांना आळा घालण्यात येणार असून अशा शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे. सीबीएसईने परवानगी न दिल्यास असे विद्यार्थी एनआयओएसकडे परीक्षेला बसण्यासाठी संपर्क साधू शकतात. वैद्यकीय आणीबाणी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग आणि इतर गंभीर कारणांसारख्या आपत्कालीन परिस्थितीतच उपस्थितीत बोर्ड २५ टक्के सूट देते. सीबीएसई या प्रस्तावावर एनआयओएसशी चर्चा करू शकते आणि पुढील शैक्षणिक सत्रात जारी करता येतील, अशी मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकते.
ज्या शाळांमध्ये विद्यार्थी केवळ प्रवेश घेतात. मात्र, शाळेमध्ये उपस्थित राहत नाहीत. केवळ परिक्षेला विद्यार्थी येतात. अशा शाळांना बोर्डाने डमी शाळा म्हटले आहे. देशभरामध्ये सीबीएसईशी संलग्नित अशा काही शाळा असल्याचे निदर्शनास आले असल्याचे समजते. डमी शाळा विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यात सूट देतात. त्यामुळे नव्या निर्णयानुसार डमी शाळांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे समजते.