CBSE 12th Result 2026 Pass Percentage: सेंट्ररल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) १२ वीचा २०२६ चा निकाल आज जाहीर झाला. या वर्षी १७ लाख ८० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी १७ लाख ६८ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेल बसले आणि त्यापैकी १५ लाख ०७ हजार १०९ विद्यार्थी हे परीक्षा पास झाले आहेत. सरासरी विद्यार्थी हे ८५.२ टक्क्यांनी पास झाले असून गेल्या वर्षीच्या ८८.३९ टक्क्यांपेक्षा यंदाचे पास होण्याचे प्रमाण हे ३.१९ टक्क्यांनी घसरले आहे.
नेहमीप्रमाणे मुलींनी यंदाही बाजी मारली असून मुलींचे पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ६.७३ टक्क्यांनी जास्त आहे. त्रिवेंद्रमने रेकॉर्ड ब्रेक उत्तीर्ण टक्केवारी गाठली आहे. त्रिवेंद्रममधील ९५.६२ टक्के मुले पास झाली असून प्रयागराजमधील फक्त ७२.४२ टक्के मुले यंदाच्या परीक्षेत पास होऊ शकली आहेत.
माऊंट अबू पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल डॉक्टर ज्योती अरोरा यांनी यंदाचे मुलांचे पास होण्याचे प्रमाण का घटले याबाबत आपले मत व्यक्त केलं. त्यांनी 'सीबीएसई १२ वीच्या निकालात पास होणाऱ्या मुलांचे प्रमाण किंचित घटण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यासाठी एक असं कारण नाही.' असं सांगितलं.
त्या म्हणाल्या, जास्त कडक आणि अधिक स्पर्धात्मक मुल्यमापण पद्धती, तसेच एनईपी २०२० अंतर्गत आता कन्सेप्ट समजण्यावर जास्त भर दिला जातोय यामुळे यंदाचा पास होण्याचा टक्का किंचित घसरला असू शकतो. याचबरोबर अरोरा यांनी उत्तर पत्रिकांचे डिजीटल मुल्यमापन यामुळं देखील निकालावर परिणाम झाला असू शकतो.
अरोरा पुढे म्हणतात, 'फक्त OSM चेकिंगशीच याला जोडून पाहू नये, आताच याबाबत काही मत व्यक्त करणं धाडसाचं होईल. हा आपण हळू हळू अॅप्लिकेशन बेस असेसमेंटकडे जातानाचा पॅटर्न असू शकतो.
दरम्यान, संस्कृती ग्रुप स्कूलचे विश्वस्त प्रणीत मनगली यांनी सांगितलं की, 'यंदा मुल्यमापण प्रणालीत OSM प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. त्यामुळं मानवी चुका मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. त्यामुळे देखील पास होण्याचे प्रमाण किंचित घटले असण्याची शक्यता आहे.'
ते पुढे म्हणाले की, 'आपल्याला एखाद्या निश्चित निष्कर्षापर्यंत येण्यासाठी अजून काही वर्षांच्या ट्रेंडचा अभ्यास करावा लागणार आहे. यात OSM लागू होण्यापूर्वीची वर्षे आणि लागू झाल्यानंतरची वर्षे यांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला कोणत्यातरी निष्कर्षापर्यंत पोहचता येईल.