CBSE New Exam Rules pudhari photo
राष्ट्रीय

CBSE New Exam Rules : सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना तारणार 'कौशल्य'!

२०२८ च्या परीक्षेपासून अटीसह नियमात बदल; एका मुख्य विषय गेला तरी पासिंगसाठी होणार मदत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२८ च्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नियमांत बदल केला असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना ५ मुख्य विषयांशिवाय १ कौशल्य विषयाचा पर्यायही मिळणार आहे. याअंतर्गत गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रात नापास झालेल्या विद्यार्थ्याला या कौशल्य विषयाचे गुण परीक्षा पास होण्यासाठी मदत ठरणार आहेत.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, २०२८ ची दहावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ मुख्य विषयांसह अतिरिक्त कौशल्य विषयाचा पर्याय मिळेल. म्हणजेच गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रात नापास झालेल्या विद्यार्थ्याला कौशल्य विषयाचे गुण परीक्षेत पास होण्यास मदत करू शकतात. मात्र, फक्त कौशल्य विषय निवडल्याने पास होण्याची हमी मिळेल, असा याचा अर्थ नाही. कारण याचा लाभ सीबीएसईच्या निर्धारित नियम व अटींच्या अंतर्गतच मिळू शकणार आहे.

अशी असेल रचना

सीबीएसईच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत दोन भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र असे पाच मुख्य विषय ' असतील. याशिवाय विद्यार्थ्यांना तिसरी भाषा, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्याशी संबंधित विषयांसह व्यावसायिक शिक्षणही घ्यावे लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना एकूण नऊ अनिवार्य विषय असतील. सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण बंधनकारक असेल. पण त्यात पर्याय निवडण्याची सुविधा असेल. व्यावसायिक शिक्षणाचे विद्यार्थी 'कौशल्य विकास' विषय किंवा सीबीएसईने ठरवलेल्या २२ कौशल्य विषयांपैकी एकाची निवड करू शकतात.

सीबीएसईच्या २२ कौशल्य विषयांच्या पर्यायात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा सायन्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय बाजारपेठ, हेल्थकेअर व डिझाईन थिंकिंग आर्दीचा समावेश आहे. निवडलेल्या विषयाची विद्यार्थ्याला दहावी बोर्ड परीक्षा द्यावी लागेल. त्यात उत्तीर्ण झाल्यास त्या विषयाचे गुण व ग्रेड बोर्डाच्या गुणपत्रिकेत नोंदवले जातील.

...तर बोर्ड परीक्षा नाही

कौशल्य विषयाच्या पर्यायांत वेगळेपण देखील आहे. विद्यार्थ्याने स्वतंत्र 'कौशल्य विकास' निवडल्यास त्याला या विषयाची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. त्याचे शाळेअंतर्गत मूल्यमापन केले जाईल. या विषयात ३३ टक्के गुण मिळवल्यास विद्यार्थ्याला शाळेतर्फे प्रमाणपत्र मिळेल. तर सीबीएसईच्या २२ पैकी एक कौशल्य विषय निवडल्यास विद्यार्थ्याला त्याची बोर्ड परीक्षा बंधनकारक असेल. परीक्षा पास झाल्यास त्याचे गुण व ग्रेड बोर्डाच्या गुणपत्रिकेत दिसतील.

मुख्य विषय गेल्यास विद्यार्थी पास होतील का ?

नव्या नियमानुसार कौशल्य विषयाचे गुण गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रात नापास झाल्यास पास होण्यास मदत करू शकतात. मात्र याला सर्व विद्यार्थ्यांसाठीचा नियम किंवा पास होण्याची हमी समजू नये. याचा लाभ बोर्डाच्या शर्तीनुसारच मिळेल. विद्यार्थी व पालकांनी कौशल्य विषयाची निवड, मूल्यांकन व मुख्य विषयात अपयशी ठरल्यास लागू होणाऱ्या नियमांची अधिकृत माहिती अवश्य पाहावी. केवळ कौशल्य विषय निवडण्याच्या आधारावर गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रात नापास झाल्यानंतरही प्रत्येक विद्यार्थी आपोआप पास होईल, असे मानणे योग्य ठरणार नाही.

  • हा बदल शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये नववी इयत्तेत शिकणाऱ्या आणि २०२८ मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू नसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT