NEET paper leak file photo
राष्ट्रीय

Pune tea vendor NEET paper leak- पुण्यातील चहावाल्याविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

Pune tea vendor NEET paper leak- नीट पेपरफुटी : विद्यार्थ्यांना मिळवून दिली प्रश्नपत्रिका

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील चहावाल्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. शेषराव बजरंग सूर्यवंशी असे या आरोपीचे नाव आहे. विद्यार्थ्यांना कथितरीत्या फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवून देण्याच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला २ सप्टेंबरला ताब्यात घेतले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तो १४ वा आरोपी आहे.

एप्रिलमध्ये पुण्यातील एका खासगी शिकवणी वर्गाबाहेर असलेल्या चहाच्या दुकानात दोन परीक्षार्थी परीक्षेच्या तयारीविषयी चर्चा करत होते. त्यावेळी सूर्यवंशी याने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याच्या ओळखीचा एक 'डॉक्टर' प्रश्नपत्रिका मिळवून देऊ शकतो. मात्र त्यासाठी प्रत्येकी ४.५ लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितल्याचा आरोप आहे. २८ एप्रिल रोजी सूर्यवंशी या दोघांना नाशिकमधील पंचक गावातील एका घरात घेऊन गेला. तेथे अन्य आठ विद्यार्थ्यांसह या दोघांनाही नीट-यूजी परीक्षेतील कथितरीत्या फुटलेले प्रश्न दिले. विद्यार्थ्यांनी तीन ते चार दिवस या प्रश्नांचा अभ्यास केल्याचे तपासातील माहितीनुसार समोर आले आहे.

१० विद्यार्थ्यांची कागदपत्रे घेतली

सीबीआयच्या तपासानुसार, सूर्यवंशीने पंचक येथील घरात आणलेल्या किमान १० विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे पैसे देण्याच्या हमीपोटी घेतली होती. दोन मे रोजी विद्यार्थ्यांना घरातून जाण्याची परवानगी दिली, त्यावेळी त्यांच्याकडील कथितरित्या फुटलेल्या प्रश्नांची कागदपत्रे परत करण्यास सांगण्यात आले. मात्र, एका विद्यार्थ्याने सर्व प्रश्न मोबाइलवर गुपचूप स्कॅन करून ठेवल्याचे तपासातील सूत्रांनी सांगितले. परीक्षा झाल्यानंतर सूर्यवंशीने एका विद्यार्थ्याकडे तीन लाख रुपये मागितले. त्या विद्यार्थ्यांच्या आईने दागिने गहाण ठेवून सूर्यवंशीला पैसे दिले. अन्य एका विद्यार्थ्याकडेही त्याने पैसे मागितले. मात्र त्या विद्यार्थ्याने वेळकाढूपणा करत पैसे दिले नाहीत.

प्रश्नांची पीडीएफ, प्रिंटआउटचा वापर

या प्रकरणातील आणखी एक आरोपी शुभम खैरनार हा करिअर समुपदेशक असून, त्याने नांदेडमधील शैक्षणिक सल्लागार नागेश नानाराव धांडे याच्याशी संपर्क साधल्याचे तपासात समोर आले. विद्यार्थ्यांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी चार दिवस राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती खैरनारने धांडे याला केली होती. यासाठी ७५ हजार रुपये देण्याची तयारी त्याने दर्शवली होती. त्यानंतर पंचक येथील एका किराणा दुकानदाराच्या रिकाम्या तळमजल्याची व्यवस्था करण्यात आली.

सीबीआयच्या तपासानुसार, खैरनारने धांडे याला प्रश्न असलेल्या अनेक पीडीएफ फाइल पाठवल्या. त्यामध्ये जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे ५५० हून अधिक प्रश्न होते. धांडे याने त्यांचे आठ संच छापून घेतले. नंतर भौतिकशास्त्राच्या प्रश्नांची पीडीएफ मिळाल्यानंतरही अशीच प्रक्रिया करण्यात आली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT