car price hike india january rupee depreciation impact
मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात लक्झरी कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक धक्का घेऊन येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि भारतीय रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे लक्झरी कार कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
लक्झरी कार सेगमेंटमधील दिग्गज कंपनी Mercedes-Benz India ने जाहीर केले आहे की, जानेवारी २०२६ पासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत २ टक्क्यांपर्यंत वाढ होईल. कंपनीने या दरवाढीचे मुख्य कारण रुपयाची कमजोरी आणि युरोच्या तुलनेत रुपयाचे १०० च्या वर असणारे अस्थिर मूल्य हे दिले आहे.
Mercedes-Benz India चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO, संतोष अय्यर यांनी स्पष्ट केले की, युरो सतत ₹१०० च्या वर व्यापार करत असल्याने कंपनीच्या उत्पादन खर्चावर मोठा परिणाम होत आहे. केवळ परदेशातून पूर्णपणे आयात होणाऱ्या (CBU) कारच नव्हे, तर भारतात असेंबल होणाऱ्या कारसाठी आयात केले जाणारे पार्ट्स आणि कंपोनंट्सही महाग झाले आहेत. यामुळे स्थानिक उत्पादनावरही खर्चाचा ताण वाढला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून लोकलायझेशनवर काम करत आहे आणि वाढत्या खर्चाचा मोठा भार स्वतः सहन करत आहे. मात्र, इनपुट कॉस्ट, वस्तूंच्या किमती, लॉजिस्टिक्सचा खर्च आणि महागाई यांचा एकत्रित दबाव आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे व्यवसायाची 'टिकाऊ क्षमता' राखण्यासाठी मर्यादित दरवाढ करणे ही आता कंपनीची मजबूरी बनली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
किंमत वाढवत असतानाच, कंपनीने ग्राहकांना थोडा दिलासा देण्याचे संकेतही दिले आहेत. संतोष अय्यर यांच्या मते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीमुळे Mercedes-Benz Financial Services आपल्या ग्राहकांना कर्ज घेताना काही सवलती देऊ शकत आहे.
‘यामुळे मासिक हप्त्यांवरील (EMI) बोजा काही प्रमाणात कमी होईल आणि वाढलेल्या किमतीचा परिणाम अंशतः संतुलित करता येईल,’ असे अय्यर यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ Mercedes-Benz या दबावाचा सामना करत नाहीये. एक दिवस आधीच BMW India ने देखील जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत.
नवीन वर्षात लक्झरी कार सेगमेंटची सुरुवात दरवाढीने होणार हे स्पष्ट झाले आहे. रुपयाची घसरण, वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक आर्थिक दबाव आता थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करत आहेत. आता इतर लक्झरी कार कंपन्याही याच मार्गाचा अवलंब करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.