Independence Day 2026 Captain Sonia Singh Chauhan
नवी दिल्ली : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीसाठी उपस्थित असलेल्या भारतीय लष्कराच्या कॅप्टन सोनिया सिंह चौहान यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ध्वजारोहणाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या मागे शिस्तबद्ध पद्धतीने कर्तव्य बजावत असलेल्या कॅप्टन सोनिया यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कॅप्टन सोनिया सिंह चौहान या भारतीय लष्करातील कमिशन्ड अधिकारी आहेत. १५ ऑगस्ट २०२६ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या औपचारिक ध्वजारोहण कार्यक्रमात आणि त्यासंदर्भातील लष्करी प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवताना त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी कॅप्टन सोनिया सिंह चौहान यांच्याकडे होती. मात्र, त्यांची वैयक्तिक माहिती किंवा त्या कोणत्या रेजिमेंटशी संबंधित आहेत, याबाबत सध्या अधिकृतपणे सविस्तर माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अत्यंत कडक लष्करी प्रोटोकॉलनुसार पार पडतो. राष्ट्रीय ध्वजाशी संबंधित औपचारिक प्रक्रिया तसेच अन्य जबाबदाऱ्या यासाठी निश्चित केलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांकडे सोपवल्या जातात. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या अगदी मागे कॅप्टन सोनिया यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
देशातील सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रीय सोहळ्यांपैकी एका सोहळ्यात महिला लष्करी अधिकाऱ्याने बजावलेली भूमिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कॅप्टन सोनिया यांच्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. “महिला आरक्षण लागू करून महिला सन्मानाच्या या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि याचे श्रेय घ्या; मात्र मातांना आणि बहिणींना त्यांचा हक्क मिळवून द्या,” असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.