Caller Name Display India: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला की, तो नेमका कोणाचा आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. कधी बँकेच्या नावाने, तर कधी एखाद्या सरकारी योजनेच्या नावाने फोन करून लोकांची फसवणूक केली जाते. मात्र, आता फोनवर कॉल येताच संबंधित व्यक्तीचं नाव समजण्याची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाने यासंदर्भात नवा आदेश जारी केला असून, 1 नोव्हेंबर 2026 पासून हा नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नव्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीचा फोन आल्यावर मोबाईलच्या स्क्रीनवर केवळ त्याचा नंबरच नव्हे, तर त्याचं नावही दिसणार आहे. हे नाव संबंधित मोबाईलधारकाच्या दूरसंचार कंपनीकडे असलेल्या ग्राहक नोंदीतील माहितीनुसार दाखवले जाईल. यासाठी दूरसंचार विभागाने 13 ऑक्टोबर रोजी आदेश जारी केल्याचे सांगण्यात आले आहे. हा नियम सर्व दूरसंचार कंपन्यांसाठी लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या अनेकदा अनोळखी नंबरवरून फोन येतात. अशा वेळी फोन करणारी व्यक्ती कोण आहे, हे समजत नाही. त्यामुळे काही लोक महत्त्वाचे कॉल उचलत नाहीत, तर काही जण फसव्या कॉल्सना बळी पडतात.
कॉल करणाऱ्याचं नाव स्क्रीनवर दिसल्यास व्यक्तीची ओळख पटवणं तुलनेने सोपं होऊ शकतं. त्यामुळे अनोळखी कॉल्स ओळखण्यासाठी या सुविधेचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, केवळ नाव दिसत असल्याने फसवणूक होणार नाही, असं नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला बँकेची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय तपशील देताना नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
हा नियम लागू झाल्यानंतर मोबाईलवर येणाऱ्या कॉल्सची ओळख पटवण्यासाठी ग्राहकांना मदत होऊ शकते. विशेषतः अनोळखी नंबरवरून येणारे व्यावसायिक कॉल, जाहिरातींचे फोन आणि संभाव्य फसव्या कॉल्स ओळखताना ही सुविधा उपयुक्त ठरू शकते.