पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह काल (दि. २०) पत्रकार परिषद घेणार होते. परंतु ती रद्द करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाची बैठक २२ जानेवारी रोजी होणार आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोपांबाबतचा खुलासा क्रीडा मंत्रालयाकडे केला आहे. महासंघासोबत बैठक झाल्यानंतर बृजभूषण शरण सिंह आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती त्यांचे पूत्र प्रतीक भूषण यांनी शुक्रवारी (दि.२०) संध्याकाळी पत्रकारांना दिली होती.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी निवडून आलेलो आहे. कोणाच्या तरी दयेमुळे या अध्यक्ष पदावर विराजमान झालेलो नाही. माझ्याविरुद्ध कुस्तीपटूंनी केलेले आंदोलन म्हणजे शाहीनबागचे धरणे आहे.
आंदोलक कुस्तीपटू काँग्रेस आणि दीपंदर हुड्डा यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. जवळपास तीन दशकांपूर्वी काँग्रेसने माझ्याविरोधात असाच कट रचला होता. पुन्हा एकदा या कटाची पुनरावृत्ती झाली आहे. मी आधी सांगितले होते की, माझ्याविरोधात षड्यंत्र रचले आहे. त्यामागे मोठ्या शक्ती आहेत. आता त्या शक्ती उघडपणे समोर येत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आणि दीपंदर हुडा यांच्या ट्विट आणि विधानांमुळे याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. हा हल्ला केवळ माझ्यावरच नाही, तर माझ्याद्वारे भारतीय जनता पक्षावर करण्यात येत आहे, असा हल्लाबोल बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर केला.
विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह देशातील ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेत्यांसह इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि अन्य काही प्रशिक्षकांवर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणाचा निषेध करत बृजभूषण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याची गंभीर दखल क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाने महासंघाच्या कामकाजातील गैरव्यवस्थापनाचे WFI कडे स्पष्टीकरण मागितले आहे.
क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण खेळाडूंच्या भवितव्याशी संबंधित असल्याने मंत्रालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. जर WFI निर्धारित वेळेत उत्तर दिले नाही. तर क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, 2011 च्या तरतुदीनुसार महासंघाविरुद्ध पुढील कारवाई करेल. दरम्यान, 18 जानेवारीपासून सुरू होणारे राष्ट्रीय कुस्ती शिबिर तूर्तास रद्द करण्यात आले आहे. मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर 18 जानेवारी पासून लखनौ येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 41 पैलवान, 13 प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह सुरू होणार होते, ते रद्द करण्यात येत आहे.
तर सुत्रांच्या माहितीनुसार, अयोध्या इथे कुस्ती महासंघाची २२ जानेवारीला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत बृजभूषण सिंह हजर राहणार आहेत. याच बैठकीत ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे. त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले होते. आपल्याविरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्याचबरोबर आपण फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने या प्रकरणाची चौकशी करू शकत नाही, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते.
हेही वाचलंत का ?