Ayodhya Ram Mandir Donation Controversy : "मी खूप कमकुवत माणूस आहे. मी सत्य बोललो तर अडचणीत येईन, कारण ते खूप शक्तिशाली लोक आहेत. सध्या माझ्यात सत्य बोलण्याचे धाडस नाही. वेळ आल्यावर मी नक्कीच बोलेन," अशा शब्दांमध्ये अयोध्या राम मंदिराशी संबंधित कथित देणग्यांच्या वादाबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
विष्णोहरपूर येथील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी समोर आणल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आपण नेमके कोणाबद्दल बोलत आहोत, याचा उल्लेख सिंह यांनी केला नाही. अयोध्या येथील राम मंदिरात जमा झालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांवरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे.
दिल्लीतील १० दिवसांच्या मुक्कामानंतर नुकतेच आपल्या गावी परतलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. २०२३ मध्ये महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, ते बऱ्याच काळापासून या वादाच्या परिणामांना तोंड देत आहेत.
NEET सह इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीप्रकरणी सिंह यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पाठराखण केली. प्रधान यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही, असे ते म्हणाले. पेपरफुटीप्रकरणी हा अनेक स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एका संघटित नेटवर्कचा (टोळीचा) परिणाम आहे. याला आळा घालण्यासाठी केवळ जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करणे हाच एकमेव उपाय असल्याचेही ते म्हणाले.