नवी दिल्ली : नवी दिल्लीत आयोजित अठराव्या 'ब्रिक्स' शिखर परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांवर जोरदार हल्ला चढवला. जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र आणि संरचनात्मक बदल घडून येत असून, 'ब्रिक्स' गटाने आता जी-७ देशांना मागे टाकले आहे, तर दुसरीकडे पाश्चात्त्य राष्ट्रांचा प्रभाव सातत्याने ओसरत चालला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पुतिन यांनी केले. भारत मंडपम येथे आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरमच्या बैठकीत जागतिक नेत्यांसमोर ते बोलत होते.
जागतिक समीकरणांवर भाष्य करताना पुतिन म्हणाले की, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक विकासाचे नेतृत्व करणाऱ्या तथाकथित जुन्या सत्तांची जागा आता नव्या आर्थिक केंद्रांनी घेतली आहे. जुन्या प्रस्थापित अर्थव्यवस्थांकडे विकसित पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संस्थांचे बळ असले, तरी काळाचा आणि अर्थव्यवस्थेचा निसर्गनियम बदलणारा आहे. आकडेवारीचा दाखला देत त्यांनी नमूद केले की, गेल्या पाच वर्षांत जागतिक जीडीपीमध्ये ब्रिक्सचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक राहिला असून जी-७ चा वाटा अवघ्या २९ टक्क्यांवर घसरला आहे. याच कालावधीत झालेल्या जागतिक आर्थिक वृद्धीपैकी निम्म्याहून अधिक योगदान ब्रिक्स देशांचे होते, तर जी-७ चा वाटा केवळ १८ टक्क्यांपुरता मर्यादित राहिला. जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ब्रिक्स देशांमध्ये असल्याने या देशांकडे गतिमान व चैतन्यशील देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध आहे, असे सांगत त्यांनी या आघाडीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.
पाश्चात्त्य देशांच्या आक्रमक धोरणावर सडकून टीका करताना पुतिन म्हणाले की, आपली आर्थिक मक्तेदारी टिकवून ठेवण्यासाठी पाश्चात्त्य सत्ता स्पर्धकांना कमकुवत करण्याचे कुत्सित प्रयत्न करत आहेत. पाइपलाइन उद्ध्वस्त करणे, आंतरराष्ट्रीय वाहतूक मार्ग रोखणे, जहाजे जप्त करणे आणि बेकायदेशीर निर्बंध लादणे अशा विकृत मार्गांचा अवलंब शासकीय स्तरावर केला जात आहे. रशियावर लादण्यात आलेले ३० हजारांहून अधिक निर्बंध हे जगातील इतर सर्व देशांवर लादलेल्या निर्बंधांपेक्षा दुप्पट आहेत. मात्र, या सर्व दबावानंतरही रशियाने आपली सार्वभौमत्व सुरक्षित ठेवत विश्वासू भागीदारांशी संबंध दृढ केले असून, गेल्या तीन वर्षांत रशियाचा आर्थिक विकास दर जागतिक सरासरीपेक्षा अधिक राहिला असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भारताच्या वाढत्या आर्थिक योगदानाचा गौरव करत ब्रिक्स ही जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात सुमारे ४५ मिनिटे महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा पार पडली. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाबाहेर प्रत्यक्ष शिखर परिषदेत सहभागी होण्याची पुतिन यांची ही पहिलीच वेळ होती. नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुतिन यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत करत त्यांना आलिंगन दिले. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना संत तिरुवल्लुवर यांच्या 'तिरुक्कुरल' ग्रंथाचा रशियन अनुवादाचा खंड भेट म्हणून दिला.
द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी राजकीय, आर्थिक, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ या क्षेत्रांतील सहकार्याचा सर्वंकष आढावा घेतला. युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे अधोरेखित करत भारताने शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठबळ देण्याची तयारी दर्शवली. भारताच्या २०२६ मधील अध्यक्षतेखाली दोन्ही देशांमधील 'विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी' आणखी बळकट करण्याचा संकल्प या वेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.