नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेच्या अतिसंवेदनशील सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या एका पोलीस हवालदाराने शस्त्रास्त्रांसह समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी पिस्तूल आणि स्नायपर रायफलचे प्रदर्शन करत इन्स्टाग्रामवर रील्स पोस्ट करणाऱ्या दीपक बांगर नामक या हवालदारावर खात्यांतर्गत चौकशी बसवून त्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे, असे वृत्त 'द प्रिंट'ने दिले आहे.
दीपक बांगर हा सुरक्षेसाठी तैनात असतानाच मागील काही दिवसांपासून आपल्या सुरक्षा चौकीवरून बंदुकांचे प्रदर्शन करणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमांवर टाकत होता. '@jaat.bangar.0143' या इन्स्टाग्राम खात्यावरून हे व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले होते. नेटकऱ्यांनी या बेजबाबदार कृत्यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित खाते बंद करण्यात आले असून या प्रकरणाच्या चौकशीला गती देण्यात आली.
प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत बांगर साध्या वेशात दिसत असून त्याच्या गळ्यात 'ब्रिक्स शिखर परिषद २०२६'चे ओळखपत्र आणि हातात सर्व्हिस पिस्तूल स्पष्टपणे दिसते. या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेलचा परिसरही नजरेस पडतो. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तो इमारतीच्या गच्चीवरून स्नायपर रायफलच्या दुर्बिणीतून पाहताना दिसत असून, पाठीमागे परिसरातील अनेक अतिमहत्त्वाच्या (VVIP) इमारती दिसून येत आहेत. एका अतिसंवेदनशील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी असताना अशा प्रकारे सुरक्षा गोपनीयतेचा भंग करून व्हिडीओ चित्रित केल्यामुळे समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांनी शिस्तभंगाच्या आरोपाखाली बांगरची ब्रिक्स बंदोबस्तातून तात्काळ हकालपट्टी करत त्याला निलंबित केले. तसेच त्याला पुन्हा मूळ उत्तर-पश्चिम जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणा लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली असून हे व्हिडीओ नेमके कोणत्या परिस्थितीत चित्रित आणि प्रसारित केले गेले, याचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. नियमानुसार पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी बांगरची नियुक्ती ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या पंचतारांकित हॉटेल्स आणि प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती.
दरम्यान, ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने दिल्ली पोलिसांच्या कार्यतत्परतेचे आणखी एक वेगळे रूप पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या एका प्रतिनिधीची टॅक्सीमध्ये राहिलेली बॅग पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत शोधून काढली. या बॅगेमध्ये भारतीय आणि अमेरिकन चलनातील सुमारे ३ लाख रुपयांची रोकड होती. प्रतिनिधी मायदेशी रवाना होण्याच्या अवघ्या काही वेळ आधी ही बॅग त्यांच्या स्वाधीन करण्यात आली, अशी माहिती 'पीटीआय'ने दिली आहे.
हे प्रतिनिधी गुरुग्राम येथील एका मॉलला भेट देऊन मध्य दिल्लीतील हॉटेलमध्ये परतले असता, पैशांची छोटी बॅग हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी बॅग गहाळ झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथके तयार करून प्रवासासाठी वापरलेल्या टॅक्सीचा माग काढला आणि कोणतीही हानी न होता संपूर्ण रोकड सुखरूप परत मिळवून दिली.