CBI arrests Lt Col in bribery case
नवी दिल्ली: बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीकडून ३ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शनिवारी (दि. २० डिसेंबर) लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा याला अटक केली. तो संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संरक्षण उत्पादन विभागात कार्यरत होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सीबीआयने तब्बल २.३६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचाराचा आरोप मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सीबीआयने १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा (उप नियोजन अधिकारी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात), कर्नल काजल बाली (कमांडिंग ऑफिसर, १६ इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिट, श्रीगंगानगर, राजस्थान) आणि दुबईस्थित एका कंपनीसह अन्य काही जणांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट कर्नल शर्मा संरक्षण क्षेत्रातील उत्पादने आणि निर्यातीशी संबंधित खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संगनमत करून त्यांना अनवाजवी सवलती मिळवून देण्यासाठी सातत्याने लाच घेत असल्याची तक्रार दाखरू झाली होती. बेंगळुरू येथील एका कंपनीचे कामकाज पाहणारे राजीव यादव आणि रवजीत सिंह हे बेकायदेशीर मार्गाने सवलती मिळवण्यासाठी शर्मा यांच्या संपर्कात होते. १८ डिसेंबर २०२५ रोजी या कंपनीच्या सांगण्यावरून विनोद कुमार याने शर्मा यांना ३ लाख रुपयांची लाच दिली होती. याप्रकरणी विनोद कुमार यालाही अटक करण्यात आली आहे.
घरात नोटांची पुडकी अटकेनंतर सीबीआयने शर्मा यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले. शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून २.२३ कोटी रुपयांची रोकड आणि लाचेचे ३ लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच, त्यांच्या पत्नीच्या श्रीगंगानगर येथील निवासस्थानातून १० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. २३ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी अटक करण्यात आलेले आरोपी लेफ्टनंट कर्नल शर्मा आणि विनोद कुमार यांना विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.