टी.पी.जी. नांबियार यांचे निधन गुरुवारी निधन झाले File Photo
राष्ट्रीय

BPL - Believe in the Best : घरोघरी TV पोहोचवणारे टी.पी.जी. नांबियार यांचे निधन

मेक इन इंडिया साकारणारे आद्य उद्योगपती काळाच्या पडद्याआड

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही घरी एखादा टीव्ही घ्यायचा ठरवले, तर तुम्हाला किती तरी ब्रँड आणि मॉडेलचे टीव्ही उपलब्ध आहेत. जगभरातील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे टीव्ही आज खेडोपाडी विकत मिळतात. पण भारताची बाजारपेठ मुक्त होण्यापूर्वी अशी काही स्थिती नव्हती. नव्वदच्या आधी आणि त्यानंतरची काही वर्षं देशात दोनच टीव्ही उपलब्ध होते, एक तर बीपीएल किंवा ओनिडा. Believe in the Best या टॅगलाईनने बीपीएलच्या जाहिराती सुरू असायच्या, तर स्पर्धक ओनिडा Neighbour's envy. Owner's pride या टॅगलाईनने जाहिराती करत असे. त्यातही टीव्हीच्या बाबती बीपीएलची आघाडी असायची.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे बीपीएल या कंपनीचे संस्थापक टी. पी. गोपलन नांबियार यांचे गुरुवारी बंगळुरू येथे निधन झाले. भारतातील कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक या उद्योगाची पायभरणी करण्याचे काम जर कोणी केले असले तर ते नांबियार यांनी. नांबियार यांनी १९६३मध्ये केरळमधून औद्योगिक कार्याची सुरुवात केली. संरक्षणक्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती आणि पुरवठा सुरू करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश फिजिकल लॅबोरॅट्रीज या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपकरणांची निर्मिती सुरू केली.

१९८२मध्ये देशात आशियायी क्रीडा स्पर्धा झाल्या, आणि देशात रंगीत टीव्हीचे आगमन झाले. नांबियार यांनी ही संधी हेरत टीव्ही आणि व्हीसीआरची श्रेणी लाँच केली. बंगळुरूतील पलक्कड येथील त्यांच्या कारखान्यात हे टीव्ही बनत. टीव्हीला मिळत असलेल्या यशातून त्यांनी फ्रिज, वॉशिंग मशिन यांची निर्मिती सुरू केली. बघता बघता भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक ब्रँड म्हणून बीपीएलचे नाव सर्वतोमुखी झाले. कंपनीचा टर्नओव्हर हा २५०० कोटींपर्यंत पोहोचला होता.

वाढती स्पर्धा

भारतीय बाजारपेठ मुक्त होत असताना देशात एलजी, सॅमसंग अशा कंपन्या दाखल झाल्या, आणि बीपीएलसमोर मोठे आव्हान उभे राहिले. बीपीएलने जपानची कंपनी Sanyo सोबत भागीदारी केली होती. तसेच बीपीएलने मोबाईल क्षेत्रातही स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. नंतरच्या काळात बीपीएल मोबाईल कम्युनिकेशनमधून बाहेर पडली.

कौटुंबिक कलह

दरम्यान नांबियार कुटुंबात अंतर्गत मतभेदही सुरू झाले होते. नांबियार यांनी जावई राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात कंपनी लॉ बोर्डमध्ये खटला दाखल केला होता. त्यानंतर दोघांत तडजोड झाली. आता बीपीएल या कंपनीच धुरा अजित नांबियार यांच्या खांद्यावर आहे. वैद्यकीय उपकरणे, प्रिंटेड सर्किट बोर्ड, मिक्सर, फ्रिज, एलईडी टीव्ही, होम थिएटर अशा किती तरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन ही कंपनी करते.

देशभरातून श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी नांबियार यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "नांबियार आघाडीचे उद्योगपती आणि नवनिर्मात होते. भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम त्यांनी केले." टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तात नांबियार यांचा उल्लेख मेक इन इंडियाचे आद्य प्रवर्तक असा करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT