bollywood news kangana ranaut slams cjp protest sansad march says all parliamentarians were scared delhi police
पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाची निंदा केली आहे. त्या म्हणाल्या की, आंदोलकांचा जमाव संसदेकडे हल्ला करत असल्यासारखा पुढे आला, तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक खूप घाबरले होते. परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल कंगना यांनी दिल्ली पोलिसांचे आभारही मानले.
दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलन सुरू आहे. २० जुलै रोजी CJPने देशभरातील विद्यार्थ्यांसोबत संसद मार्च काढला. 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विविध विद्यार्थी संघटनांचे हजारो आंदोलक NEET पेपर लीक प्रकरण आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसद भवनापर्यंत पोहोचले. CJPच्या या आंदोलनाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी या आंदोलनाचा निषेध करत त्याला 'गोंधळ' म्हटले आहे.
CJP आंदोलनावर कंगना रनौत काय म्हणाल्या?
पावसाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना कंगना रनौत यांनी CJPच्या आंदोलनावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, संसद भवनाबाहेर आंदोलक पोहोचले, त्यावेळी सर्व खासदार संसदेतच होते. आंदोलक आपल्यावर हल्ला करू शकतात, अशी भीती सर्वांना वाटत होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी कोणालाही इजा होऊ दिली नाही.
कंगना यांना बैठकीत काय चर्चा झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सांगितले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कंगना म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. युवक आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांबाबत आम्हाला अनेक सूचना मिळाल्या. पंतप्रधानांनी NEET संदर्भातील आपली रणनीती आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा केली."
कंगना म्हणाल्या, 'आम्हाला भीती वाटली होती'
आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळात युवक आणि पोलिसांना दुखापत झाली, त्यावर कंगना यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, "संसदेच्या आत सर्वजण खूप घाबरले होते आणि गेट्सही बंद करण्यात आले होते. आम्हाला हालचाल करणेही शक्य होत नव्हते. जमाव ज्या पद्धतीने हल्ला करत असल्यासारखा पुढे आला, ते पाहून एका क्षणी आम्हालाही भीती वाटली. आंदोलक आपल्यावरही हल्ला करतील, असे वाटले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी ढालीसारखे उभे राहून दगडफेक सहन केली आणि मारही खाल्ला, त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करते. त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ दिली नाही."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या मुद्द्यावरून CJP गेल्या काही दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. सोमवारी हजारो आंदोलक दिल्लीतील जंतर-मंतरवर एकत्र आले. त्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत अनेक आंदोलक तसेच काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
दरम्यान, CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे.