Disha Patani House Shooting Bobby Kabootar Arrest: दिल्ली पोलिसांनी बुधवारी फरार गँगस्टर महफूज अली उर्फ बॉबी कबूतर याला अटक केल्याची माहिती दिली. हा बॉबी कबूतर हा लॉरेन्स बिश्नोई - हशीम बाबा गँगमधील एक महत्वाचा सदस्य आहे. ४७ वर्षाचा बॉबी कबूतर गेल्या ७ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. यात उत्तर दिल्लीतील जफ्राबाद मधील डिसेंबर महिन्यातील डबल मर्डरचा समावेश आहे. यात दोन भावांना जवळपास ५० वेळा गोळी मारली होती. तसेच २०२४ मध्ये ३५ वर्षाचा उद्योगपती नादिर शहा याची देखील जीमच्या बाहेर हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात देखील बॉबी कबूतर वॉन्टेड होता.
याचबरोबर महफूज उर्फ बॉबी कबूतरने अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार देखील केला होता. त्या प्रकरणात देखील तो वॉन्टेड होता.
बॉबी कबूतर सोबत तीन जणांना देखील अटक करण्यात आली आहे. यात ३२ वर्षाची खुशनुमा अन्सारी उर्फ नेहा, मोहम्मद राझी खान (वय २५), मोहम्मद शाहबाज (वय ३४) यांना देखील अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी उशिरा रात्री महिपालपूर इथं हे सर्वजण गाडीतून जात असताना ही कारवाई केली. पोलिसांनी यांच्याकडून अनेक पिस्तूल आणि गोळ्या जप्त केल्या आहेत.
पोलिस म्हणाले, 'आम्ही तपास करण्यासाठी या गुन्हेगारांविरूद्ध १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. ते महिपालपूरमध्ये कोणता गुन्हा करण्यासाठी आले होते का याचा देखील तपास करणार आहोत. अली उर्फ बॉबी कबूतर याचा अनेक हाय प्रोफाईल गुन्ह्यात समावेश असल्याचा आरोप आहे. त्याच्या तपासावर देखील आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहे.'
पोलीस पुढे म्हणाले, 'अली हा दिल्लीच्या गुन्हेगारी वर्तुळात बॉबी कबूतर नावानं प्रसिद्ध होता. हे टोपण नाव त्याला तो घराच्या टेरेसवर कबूतर पाळत असल्यामुळं त्याच्या शेजाऱ्यांनी दिलं होतं.'
काऊंटर इंटेलिजन्स विभागाला महफूज अली हा दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सांगितलं की अली हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत महिपालपूर भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही सापळा रचला.'
या बॉबी कबूतरचा सहभाग हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाशी असल्याचा देखील आरोप आहे. तसेच बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेलीमधील घराजवळ देखील गोळीबार झाला होता. त्यात देखील या बॉबीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.