BJP Party President Selection
नवी दिल्ली : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावर तर्क लावले जात आहेत. मात्र, यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार नाही. २ ते ९ जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आहेत. ते परतल्यानंतर भाजपच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरु होईल. १४ जुलैपर्यंत भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली असेल.
भाजपच्या घटनेच्या कलम १९ नुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाते. ही निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणीने ठरवून दिलेल्या नियमांनुसार घेतली जाईल, असे पक्षाच्या घटनेत नमूद केले आहे. भाजपच्या घटनेनुसार, किमान ५० टक्के म्हणजे अर्ध्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. त्यानुसार येणाऱ्या दोन दिवसांत अर्ध्याहून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झालेली असेल. परिणामी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष निश्चित
महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदी केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. हिमाचल प्रदेश भाजपचे डॉ. राजीव बिंदल यांना तिसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडण्यात येणार आहे. डॉ. बिंदल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याही नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. तेलंगणामध्ये एन. रामचंद्र राव हे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांची निवड निश्चित आहे, कारण त्यांच्याविरुद्ध इतर कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उत्तराखंडमध्ये महेंद्र भट्ट यांच्या गळ्यात पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. तर, मिझोरममध्ये के. बेचुआ यांची नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली.
सदर पाच राज्यांमधील अध्यक्षांच्या निवडीसह, भाजप १९ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांची निवडणूक पूर्ण करेल. यानंतर, २ जुलै रोजी मध्य प्रदेशात निवडणुका प्रस्तावित आहेत. यामुळे एकूण २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती होईल. लवकरच पश्चिम बंगालमध्ये देखील प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. ओडिशा भाजपच्या अध्यक्षपदाची निवड रविवारी होणार होती. मात्र, पुरीमध्ये रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही प्रक्रिया स्थगित केली. त्यानंतर आता २ जुलै रोजी ओडिशाचा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूक होईल.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेतील नावे
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. चर्चेतील नावांच्या यादीत शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. मनोज सिन्हा, बी. एल. संतोष यांच्याही नावाची अधून मधून चर्चा झाली आहे. या व्यतिरीक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र, भाजप अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. चर्चेत नसलेल्या नेत्याकडे पक्षाचे सूत्र जाऊ शकतात, असेही मानले जात आहे.