BJP vs Congress : 'हायकमांड' म्हणजे नक्की कोण? भाजप खासदारांनी खर्गेंना असा सवाल का केला?
BJP vs Congress : कर्नाटक काँग्रेसमध्ये संभाव्य नेतृत्व बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. याबाबत माध्यमांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारले असता 'हे सर्व पक्षाच्या हायकमांडच्या हातात आहे,' असे उत्तर त्यांनी दिले. त्यांच्या या उत्तरावर भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी हायकमांड म्हणजे नक्की कोण? असा सवाल केला आहे.
काय म्हणाले होते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे?
डी. शिवकुमार शिवकुमार लवकरच कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीत वर्तुळात होत आहे. यामुळे कर्नाटकमध्ये संभाव्य नेतृत्व बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "हे सर्व पक्ष हायकमांडच्या हातात आहे. हायकमांडमध्ये काय चालले आहे, हे कोणीही सांगू शकत नाही.पुढील कारवाई करण्याचा अधिकार त्यांना आहे, पण कोणीही विनाकारण समस्या निर्माण करू नये."
'न दिसणारे, न ऐकू येणारे' हायकमांड नक्की आहे तरी कोण? : भाजपचा खोचक सवाल
पक्षाचे अध्यक्ष असूनही कर्नाटकमधील नेतृत्त्व बदलावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी कोणतीही माहिती न देता चेंडू हायकमांडच्या कोर्टात ढकलला. याच संधीचा फायदा घेत भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी एक थेट प्रश्न विचारला: "हे 'न दिसणारे, न ऐकू येणारे' हायकमांड नक्की आहे तरी कोण?" काँग्रेस अध्यक्ष हायकमांड नाहीत, तर हे 'सतत जाणवणारे' हायकमांड नक्की कोण आहे?सूर्या यांनी 'X' एका पोस्टमध्ये खर्गे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी लिहिले, "काँग्रेस हायकमांड हे भूतासारखे आहे. ते दिसत नाही, ऐकू येत नाही; पण त्याचे अस्तित्व नेहमी जाणवते. ज्या काँग्रेस अध्यक्षांना लोक हायकमांड समजत होते, ते स्वतःच त्याचे नाव कुजबुजतात आणि सांगतात की ते हायकमांड नाहीत. किती विचित्र आहे हे!"

