के. अन्नामलाई यांच्‍या राजीनाम्‍यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी कार्यकर्त्यांना पक्ष सोडून न जाण्याचे आवाहन केले आहे.  Pudhari
राष्ट्रीय

Tamil Nadu BJP | 'आपल्याकडे PM मोदी आहेत'; अन्नामलाईंच्या राजीनाम्‍यानंतर तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोणते आवाहन केले?

Tamil Nadu BJP mass resignation | तामिळनाडू भाजपमध्‍ये मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरुच

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu BJP mass resignation

चेन्‍नई : तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी राजीनामा देऊन नवीन राजकीय चळवळ सुरू केल्यानंतर, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना पक्ष सोडून न जाण्याचे आवाहन केले. या घडामोडींमुळे भाजपवर कोणताही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

कृपया इथेच राहा...

चेन्नईत माध्‍यमांशी बोलताना नागेंद्रन म्‍हणाले की, "माझी भाजप कार्यकर्त्यांना विनंती आहे की, इतर कोणत्याही पक्षात किंवा चळवळीत जाऊ नका. कृपया इथेच राहा. भाजप हा जगातील एक मोठा पक्ष आहे. आपल्याकडे जगातील नंबर वन नेते, पंतप्रधान मोदी आहेत," असे नागेंद्रन म्हणाले.

भाजप हा खूप मोठा पक्ष

अन्नामलाई यांच्या जाण्याने तामिळनाडूतील भाजपच्या जनाधाराला धक्का बसेल, हा दावाही नागेंद्रन यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, "याचा कोणताही परिणाम होणार नाही. भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. यापूर्वीही अनेक नेते पक्ष सोडून गेले आणि पुन्हा पक्षात सामील झाले."

राजीनामा सत्र आणि नवीन राजकीय चळवळ

अन्नामलाई यांनी अधिकृतपणे भाजपचा राजीनामा दिला. यानंतर त्‍यांनी 'सामान्य माणसाचे राजकारण' अशी हाक देत राज्यातील 'व्यक्तीपूजा' आणि घराणेशाहीचे राजकारण संपवण्याच्या उद्देशाने एक नवीन राजकीय चळवळ सुरू केली आहे. याच्या दुसऱ्याच दिवशी नागेंद्रन यांचे हे वक्तव्य आले आहे.

तामिळनाडू भाजपमध्ये राजीनाम्याची लाट

अन्नामलाई यांच्या राजीनामान्‍यानंतर तामिळनाडू भाजपमध्ये राजीनाम्याची लाट आली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कारू नागराजन, प्रदेश सचिव सुमती व्यंकटेश आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे आणखीही अनेक नेते अन्नामलाई यांच्या नव्या राजकीय व्यासपीठावर सामील होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

राजीनामा देताना काय म्‍हणाले होत अन्‍नामलाई

माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नामलाई यांनी तामिळनाडूत भाजपचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका नवीन आणि अधिक सर्वसमावेशक व्यासपीठाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण भाजपमधून शांततापूर्ण मार्गाने बाहेर पडलो असून पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आपल्याला अजूनही आदर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप विचारसरणीवर आधारलेला पक्ष

नेत्यांच्या राजीनाम्यानंतरही नागेंद्रन यांनी भाजप अजूनही मजबूत असून राज्यात पक्षाची वाढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाचे भविष्य कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून नाही आणि कार्यकर्ते भाजपच्या विचारसरणीशी बांधील राहतील, असे ते म्हणाले."भाजप हा काल-परवा स्थापन झालेला पक्ष नाही. हा विचारसरणीवर आधारलेला पक्ष आहे आणि या घडामोडींचा पक्षावर निश्चितच कोणताही परिणाम होणार नाही. लोकशाहीत कोणालाही नवीन राजकीय पक्ष काढण्याचा अधिकार आहे. अन्नामलाई यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला कोणताही फरक पडणार नाही," असे नागेंद्रन यांनी स्पष्ट केले होते.

'वी द लीडर्स' चळवळीला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

अन्नामलाई यांनी सुरू केलेल्या 'वी द लीडर्स' (We The Leaders) या नव्या चळवळीला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ८ लाखांहून अधिक स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. यावरून अन्नामलाई यांच्या नव्या राजकीय प्रवासाला भरभरुन प्रतिसाद मिळत असल्‍याचे चित्र आहे. तामिळनाडूमध्ये 'विकासाभिमुख आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित' राजकारणाला चालना देणे, हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट असेल, असे अन्नामलाई यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT