Nishikant Dubey on Modi
नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि गोड्डा (झारखंड) येथील खासदार निशिकांत दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षाचे अनिवार्य नेतृत्व ठरवत, 2029 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींशिवाय भाजपला 150 जागाही जिंकता येणार नाहीत, असा थेट इशारा दिला आहे.
ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीच्या दोन मिनिटांच्या टीझरमध्ये दुबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी, ऑपरेशन ब्लूस्टार, तसेच सुप्रीम कोर्टावरील वादग्रस्त वक्तव्यांवर भाष्य केले आहे.
खा. दुबे म्हणाले, “मोदीच पुढील 15-20 वर्षांसाठी भाजपचे केंद्रस्थानी नेतृत्व असायला हवे. त्यांच्याशिवाय 2029 मध्ये भाजप 150 जागाही मिळवू शकणार नाही.”
RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या 75 वयानंतर नेत्यांनी बाजूला व्हावे या सूचनेवर प्रतिक्रिया देताना दुबे म्हणाले, “या नियमाची गरज मोदींवर नाही. मोदींना भाजपची गरज नाही, भाजपला मोदींची गरज आहे.”
महाराष्ट्रातील भाषिक वादावर भाष्य करताना दुबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे ज्या राज्यात जातील, तिथले लोक त्यांना आपटून आपटून मारतील.”
“मी खासदार आहे. मी कायदा हातात घेणार नाही. पण जनतेचा रोष कोणी थोपवू शकणार नाही.” असा सूचक इशाराही दुबे यांनी दिला.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी असलेला वैयक्तिक आणि राजकीय संबंधही दुबे यांनी उघड केला. त्यांनी सांगितलं की, “ओवेसी आमचे जुने कौटुंबिक मित्र आहेत. राजकारणात आमच्यात संघर्ष असतो, पण व्यक्तिगत नातं सौहार्दाचं आहे.”
दोघेही अलीकडे ऑपेरशन सिंदूरच्या एका सात सदस्यीय प्रतिनिधीमंडळाचा भाग होते, ज्यांनी सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन आणि अल्जेरिया या देशांना भेट दिली होती.
सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूमधील राज्यपालांच्या अधिकारांवर निर्णय दिल्यानंतर दुबे यांनी विधानसभेचं महत्त्व कमी होत असल्याचं विधान केलं होतं. त्यावर ओवैसी यांनी प्रत्युत्तरात त्यांना “ट्यूबलाईट” आणि “थम्स अप” म्हणत संविधानातील अनुच्छेद 142 वरून चांगलंच झापलं होतं.
निशिकांत दुबे यांनी 2009 मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं. त्यानंतर ते सलग गोड्डा मतदारसंघातून विजयी होत आहेत. सुप्रीम कोर्टापासून राज ठाकरेपर्यंत आणि ओवेसींपर्यंत, दुबे यांची वक्तव्यं सतत चर्चेचा विषय ठरतात.
2029 च्या निवडणुकांकडे भाजप कशा पद्धतीने पाहतो आणि मोदींचं स्थान पक्षात किती अढळ आहे, हे निशिकांत दुबे यांच्या या विधानांवरून स्पष्ट होतं. मात्र, त्यांच्या वादग्रस्त भाष्यांमुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना वाव मिळाला आहे.