पुढारी ऑनलाईन डेस्क
हिमाचलमधील भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी तीन कृषी कायद्यांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. कंगना यांनी आज बुधवारी म्हटले की, २०२० मधील शेतकरी आंदोलनाचे कारण ठरलेले तीन कृषी कायदे परत आणले जावेत, या त्यांच्या विधानांबद्दल त्यांना 'खेद वाटतो' आहे. कंगना यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर मागे घेतलेले कृषी कायदे परत आणले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वत:च याची मागणी करावी.'' असे वक्तव्य केले होते. त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपले विधान मागे घेतले.
"मला माहित आहे की हे वादग्रस्त ठरेल... पण मला वाटते की रद्द केलेले कृषी कायदे परत आणायला हवेत. शेतकऱ्यांनी स्वतःच याबाबत मागणी केली पाहिजे. ते देशाच्या विकासासाठी एक मजबूत आधारस्तंभ आहेत आणि मला त्यांना आवाहन करायचे आहे की, ते कायदे तुमच्या हितासाठी परत आणण्याची मागणी करावी,” असे कंगना रनौत यांनी म्हटले होते.
पण कंगना यांचे विधान ही पक्षाची भूमिका नाही, असा खुलासा भाजपने केला होता. "कंगना रनौत यांना भाजपच्या वतीने असे विधान करण्याचा अधिकार नाही आणि कृषी कायद्यांबाबत हे भाजपचे विधान नाही," असे पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले. त्यावर कंगना यांनी भाटिया यांच्या विधानाला प्रतिसाद देत, "कृषी कायद्यांबद्दल ही माझी वैयक्तिक मते आहेत आणि ही पक्षाची भूमिका नाही." असा खुलासा केला आहे.
त्यांनी एक व्हिडिओ जारी करत, त्यांच्या विधानांमुळे बरेच लोक नाराज असल्याचे म्हटले आहे. "मी केवळ एक कलाकार नाही तर भाजपची कार्यकर्तीही आहे हे मी लक्षात ठेवायला हवे. माझी मते वैयक्तिक नसावीत आणि तशी पक्षाची भूमिका असायला हवी. माझ्या विधानांमुळे कोणी नाराज झाले असेल तर मला त्याचा खेद वाटतो आणि मी माझे विधान मागे घेत आहे," असे कंगना यांनी म्हटले आहे.