पुढारी ऑनलाईन डेस्क : "कोणत्याही समाजावर भाष्य करताना निष्काळजीपणा करू नका," असे फटकारत बंगळूरचा एक भाग पाकिस्तान असल्याचे विधान करणार्या न्यायाधीशांचा माफीनामा आज (दि.२५) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वीकारला.
एका सुनावणी दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही श्रीशानंद यांनी बंगळूरचा एक भाग पाकिस्तान असल्याची टिपण्णी केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरु केली. न्यायमूर्ती श्रीसनंदन यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याअध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यांचा माफीनामा स्वीकारला.
आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, निष्काळजी टिप्पण्या एखाद्या व्यक्तीचे पक्षपाती विचार दर्शवतात. न्यायाधीशांनी कोणत्याही समुदायाच्या विरोधात किंवा त्यास हानिकारक असलेल्या अशा टिप्पण्या टाळल्या पाहिजेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या खटल्यात पक्षकार नव्हते, आम्ही आत्ताच अधिक काही बोलणार नाही; परंतु समुदाय आणि लिंगाविषयक केलेल्या टिप्पण्यांबद्दल आम्ही गंभीरपणे चिंतित आहोत. अशा टिप्पण्या नकारात्मक प्रतिमा तयार करतात. याचा परिणाम न्यायालय आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेवरही होतो. आम्ही हे प्रकरण बंद करत आहोत; परंतु इलेक्ट्रॉनिक युगात न्यायाधीश आणि वकिलांनी योग्य भाष्य केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.