bjp leader anurag thakur on rahul gandhi pc hydrogen bomb remark bjp counter attack
‘‘जनतेने सातत्याने नाकारल्यामुळे आणि सततच्या निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधी हताश आणि निराश झाले आहेत. राहुल गांधी यांनी ‘आरोपांचे राजकारण’ हा आपला अलंकार बनवला आहे. जेव्हा हेच आरोप सिद्ध करण्याची वेळ येते, तेव्हा ते पळ काढतात,’’ अशी खिल्ली उडवत भाजपने खरमरीत प्रत्युत्तर दिले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील गैरव्यवहार झाल्याचा पुरुच्चार केला. त्यांचे हे आरोप भाजपने तत्काळ खोडून टाकले. यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी जोरदार हल्ला चढवला.
अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, ‘‘राहुल गांधी यांना चुकीचे आणि निराधार आरोप करण्याची सवयच लागली आहे. निवडणूक आयोग जेव्हा त्यांच्या आरोपांची पडताळणी करण्यास सांगतो, तेव्हा ते माघार घेतात. त्याचप्रमाणे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असता, ते नकार देतात. आरोप करणे, नंतर माफी मागणे आणि न्यायालयाने फटकारणे हे राहुल गांधींचे काम बनले आहे. त्यांना प्रत्येक बाबतीत फटकारले गेले आहे,’’ अशी बोचरी टीका केली.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर उपरोधिक टोला लगावताना अनुराग ठाकूर म्हणाले की, पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, पण त्यांना फुरफुरबाजावरच समाधान मानावे लागले.’
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला जवळपास ९० निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे त्यांची निराशा दिवसेंदिवस वाढत चालली आहे, असा दावाही अनुराग ठाकूर यांनी केला.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटले की, राहुल गांधी नेहमीच अशा प्रकारची विधाने करून देशाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. निवडणूक आयोगाने त्यांना तांत्रिक आणि घटनात्मकदृष्ट्या जे करण्यास सांगितले आहे, ते ते करत नाहीत. ते रोज पत्रकार परिषदा घेऊन खोटे बोलतात. माझ्या मते, त्यांना इतके कमी मतदान का झाले? आणि त्यांचा पराभव का झाला? याचे त्यांनी आत्मचिंतन केल्यास ते आयुष्यात थोडेफाय पुढे जातील. जेव्हा एखादी व्यक्ती आत्मचिंतन करते, तेव्हा तिला आपल्या चुका कळतात आणि त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते,’’ असा साटम यांनी टोला लगावला.
ते पुढे म्हणाले की, ‘‘खरेतर देशाचे नागरीक राहुल गांधींच्या निराधार आरोपांकडे लक्ष देत नाही. जर त्यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी घटनात्मक, तांत्रिक आणि लोकशाही प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. ते या प्रक्रियेचे पालन करत नाहीत, कारण त्यांचा खोटेपणा उघड होईल, याची त्यांना जाणीव आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री संजय सेठ म्हणाले की, ‘‘हे दिवाळखोरीचे लक्षण आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुम्ही एका घटनात्मक संस्थेवर आरोप करत आहात. तुम्हाला ना ईडीवर विश्वास आहे, ना सीबीआयवर, ना निवडणूक आयोगावर, ना ईव्हीएमवर, ना जनतेवर विश्वास आहे. तुम्ही तर ऑपरेश सिंदूरवरही प्रश्नचिन्ह निर्माण केला. हे काय सुरू आहे? म्हणूनच देशातील जनता तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. जनतेने तुम्हाला तिसऱ्यांदा बाजूला बसवले, म्हणून तुम्ही तुमचा संताप निवडणूक आयोगावर काढत आहात.’’