नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत शीख समुदायावर केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत भाजप राहुल गांधींसह काँग्रेसवर हल्ला करत आहे. या संदर्भात देशात विविध राज्यात भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर अमेरिकेतील भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आणि भाजप नेहमीप्रमाणे खोटी माहिती पसरवत आहे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
अमेरिकेतील भाषणाचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "भाजप अमेरिकेतील माझ्या वक्तव्याबाबत खोटेपणा पसरवत आहे. मला भारतात आणि परदेशात राहणाऱ्या प्रत्येक शीख बंधू-भगिनींना विचारायचे आहे, मी जे काही बोललो त्यात काही चुकीचे आहे का? भारत एक नसावा का? असा देश जिथे प्रत्येक शीख आणि प्रत्येक भारतीय कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या धर्माचे पालन करू शकेल?, अशा मजकुरासह त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप नेहमीप्रमाणे खोट्या गोष्टी पसरवत आहे. ते मला शांत बसवायला हताश आहेत कारण ते सत्य सहन करू शकत नाहीत, मात्र मी नेहमीच भारताची व्याख्या करणाऱ्या विविधतेत एकता, समानता आणि प्रेम या मूल्यांसाठी बोलत राहीन, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी १० सप्टेंबरला वॉशिंग्टन डीसी येथे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या एका कार्यक्रमात म्हणाले होते की, "भारतातील शीख समुदायामध्ये चिंता आहे की त्यांना पगडी आणि कडा घालण्याची परवानगी दिली जाईल की नाही? ते गुरुद्वारामध्ये जाऊ शकतील का? ही केवळ शीखांसाठीच नाही तर सर्व धर्मीयांसाठी चिंतेची बाब आहे.” असेही राहुल गांधी म्हणाले होते.